युवकाला मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध फोंडा पोलिसांत अखेर तक्रार दाखल

श्रेयश हर्डीकर मारहाण प्रकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
7 hours ago
युवकाला मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध फोंडा पोलिसांत अखेर तक्रार दाखल

फोंडा : श्रेयश हर्डीकर याला मारहाण केलेल्या पोलिसाविरुद्ध फोंडा पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. या कामी पोलीस अधीक्षक कार्यालयाने केलेल्या सहकार्याचे श्रेयस याच्या आईने आभार व्यक्त मानले आहेत.

१० सप्टेंबर रोजी श्रेयश हर्डीकर याला म्हार्दोळ पोलीस ठाण्यात सेवा बजावत असलेल्या विनोद नामक पोलिसाने दंडुक्याने मारहाण केली होती. सदर पोलीस निष्पाप कुत्र्यांना मारत असल्याचा व्हिडिओ श्रेयशने काढला होता. तो राग मनात धरून त्या कॉन्स्टेबलने हातातील दंडुक्याने त्याच्या मानेवर वार केला होता. सध्या श्रेयश इस्पितळात उपचार घेत आहे. एवढे मोठे प्रकरण झालेले असताना फोंडा पोलिसांनी मात्र तक्रार करून घेण्यास टाळाटाळ केली. शेवटी प्रसारमाध्यमांतून श्रेयश व त्याच्या आईने या प्रकाराला वाचा फोडली. त्यावेळी पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.

मुख्यमंत्र्यांनी याबद्दल मध्यस्थी करण्याचे आवाहन श्रेयशच्या आईने केले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची दखल घेतली. कायदा हातात घेणाऱ्या पोलिसाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश अधीक्षक कार्यालयातून देण्यात आला आहे. दरम्यान, श्रेयश हर्डीकर याच्या आईने पोलीस अधीक्षकांचे आभार मानले असून मारहाण करणाऱ्या पोलिसाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा