ग्रामस्थांत भीतीचे वातावरण : हत्तीला पुन्हा गोव्यातून बाहेर पिटाळण्यासाठी प्रयत्न
महाराष्ट्रातून मोपा भागात दाखल झालेला हत्ती.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महाराष्ट्राच्या सीमेवरील नेतार्डे येथून गोव्यातील मोपाच्या जंगल भागात ‘ओंकार’ हत्ती पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोवा व महाराष्ट्राचे वन खाते हत्तीच्या हालचालीवर ड्रोनद्वारे नजर ठेवून आहे. हत्तीला त्याच्या मूळ जागी पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वन खात्याचे अधिकारी जीस वर्की यांनी दिली. हत्ती गोव्याबाहेर जात नाही, तोपर्यंत ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मोपाचे सरपंच सुबोध महाले यांनी केले आहे.
पंदरा दिवसांपूर्वी हत्तीच्या कळपाने मोपा, हसापूर, चांदेल, इब्रामपूर भागात थैमान घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आता कळपातील एकच हत्ती मोपा येथे पोहोचल्याने भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग तालुक्यात हत्ती तसेच हत्तीणीच्या कळपाचे वास्तव्य होते. महाबली, गणेश आणि ओंकार या तीन हत्तींचे दोडामार्ग भागात बराच काळ वास्तव्य होते. यापैकी ओंकार हत्ती कळपातून दूर होऊन नेतार्डे मार्गे मोपाच्या जंगलात पोहोचला आहे. हा हत्ती मोपाच्या जंगलात दाखल झाल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
हत्तीला पिटाळून लावण्यासाठी प्रयत्नरत असलेले वन विभागाचे कर्मचारी.
हत्तीच्या हालचालींवर ड्रोन सिग्नलच्या
आधारे नजर : जीस वर्की, वन अधिकारी
ओंकार हत्ती शनिवारी रात्री मोपाच्या जंगलात दाखल झाला. ड्रोन सिग्नलच्या आधारे त्याच्यावर नजर ठेवणे सुरू आहे. सिग्नल योग्य प्रमाणात मिळत नसल्याने हत्तीवर सतत नजर ठेवणे शक्य होत नाही. वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चमू मोपा भागात तैनात आहे. गोवा वन खात्याचे अधिकारी सिंधुदुर्ग वन विभागाच्या संपर्कात आहेत, असे उप वन संरक्षक (डीसीएफ) जीस वर्की यांनी सांगितले.
घाबरू नका; पण सतर्क राहा : मुख्य वन संरक्षक
कळपातील ओंकार हा हत्ती वाट चुकून गोव्याच्या जंगलात आला आहे. हत्तींचा कळप असता तर ते अधिक आक्रमक आणि धोकादायक असतात. हा हत्ती एकटाच आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. हत्तीला त्याच्या मूळ जागी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्य वन संरक्षक नवीन कुमार यांनी सांगितले.
हत्ती आल्याचे वन खात्याने सांगितले : ग्रामस्थ
मोपा भागातील जंगलात हत्ती आल्याची माहिती सर्वप्रथम वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री दिली. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नका, असेही त्यांनी सांगितले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
हत्ती नेतार्डेच्या मार्गाने परत जाईल : राजेंद्र केरकर
हत्ती मोपाच्या जंगलात दाखल झाल्याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी तातडीने मोपा भागाला भेट दिली. नेतार्डेच्या मार्गाने मोपाच्या नो फ्लाय झोनमध्ये सध्या हत्तीचा वावर आहे. तो परत नेतार्डेच्या मार्गाने जाऊ लागला आहे. नेतार्डे भागात वायंगण शेती मोठ्या प्रमाणात होते. भूक भागवण्यासाठी हत्ती परत नेतार्डेच्या मार्गाने जाईल, असे राजेंद्र केरकर यावेळी म्हणाले.
रात्रीच्या वेेळी घराबाहेर पडू नका : सरपंच
जोपर्यंत वन खाते हत्तीला पिटाळून लावत नाही, तोपर्यंत लोकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये. एकट्याने वाहन घेऊन फिरू नये. काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी, असे आवाहन मोपाचे सरपंच सुबोध महाले यांनी केले.
झाडावर चढला म्हणून वाचला...
‘ओंकार’ हत्ती रविवारी सायंकाळी गावठण वाडा-मोपा येथील श्री वेताळ मंदिरा जवळ आला होता. त्या ठिकाणापासून जवळच असलेल्या आपल्या बागेत सत्यवान दयानंद परब काही कामानिमित्त गेले होते. हत्ती त्यांच्या नजरेस पडला. परब यांनी हत्तीला लोकवस्तीत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र हत्ती त्यांच्यावरच चाल करून येऊ लागला. जीव वाचवण्यासाठी सत्यवान परब जवळच असलेल्या काजूच्या झाडावर चढले. काजूच्या झाडावरून ते सागवानाच्या झाडावर चढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचवा. नंतर हत्ती पेडणेकर वाड्याच्या दिशेने गेला.