हिंदू धर्माविरोधात संदेश पाठवल्याबद्दल धमकावून ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे ८० लाखांचा गंडा

काणकोणमधील व्यक्तीला फसवले : सायबर विभागाकडून तपास सुरू


9 hours ago
हिंदू धर्माविरोधात संदेश पाठवल्याबद्दल धमकावून ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे ८० लाखांचा गंडा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आधार कार्डचा वापर करून मोबाईल क्रमांकावरून हिंदू धर्माविरोधात संदेश पाठवल्याचे भासवून काणकोण तालुक्यातील एका व्यक्तीला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोलये- काणकोण येथील एका नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यांना एनसीआरबी आणि साहर पोलीस स्थानकाचा अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने १८ जुलै रोजी व्हॉट्सअॅप कॉल केला. तक्रारदाराच्या आधार कार्डचा वापर करून एक मोबाईल क्रमांक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर मोबाईल क्रमांकावरून हिंदू धर्माविरोधात संदेश पाठवल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. त्यांना वेगवेगळे तपास अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. हे प्रकरण मिटविण्यासाठी संशयितांनी तक्रारदाराला १८ जुलैपासून वेगवेगळ्या चार बँक खात्यांमध्ये मिळून ८० लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले.
आपण फसवले गेलो आहोत, याची जाणीव होताच तक्रारदाराने गोवा पोलिसांच्या सायबर विभागात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात मोबाईलधारकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
‘डिजिटल अरेस्ट’च्या घटनांबाबत सतर्कता आवश्यक
‘डिजिटल अरेस्ट’ हा आधुनिक सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. यात गुन्हेगार स्वतःला पोलीस, सरकारी अधिकारी किंवा बँकेचा कर्मचारी म्हणून दाखवतात. फोन, ई-मेल किंवा सोशल मीडियाद्वारे ते लोकांशी संपर्क साधतात. घाबरवण्यासाठी ते बनावट वॉरंट, अटक आदेश किंवा गुन्ह्याची खोटी माहिती देतात. व्यक्तींना ऑनलाईन ‘व्हिडिओ कॉल कोठडी’ किंवा ‘डिजिटल नजरकैद’ दाखवली जाते. भीती दाखवून लोकांकडून लाखो रुपये उकळले जातात. सरकार, पोलीस आणि बँका सतत लोकांना सतर्कतेचे आवाहन करत आहेत. दूरदर्शन, वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर याबाबत जनजागृती मोहिमा सुरू आहेत. तरीदेखील अनभिज्ञता व भीतीमुळे अशा घटना वारंवार घडतात. प्रत्येकाने अशा कॉल किंवा संदेशांची सत्यता तपासूनच प्रतिक्रिया दिली पाहिजे.