अज्ञात लिंकवर क्लिक करणे पडले महागात; गुन्हा नोंद
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : फोंडा तालुक्यातील एका व्यक्तीला अज्ञात व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संदेश पाठवून ७.७२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बांदोडा-फोंडा येथील अजय देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला ८८१७३५३७१७ या क्रमांकावरून २१ मे २०२५ रोजी संदेश आला होता. तो संदेश उघडल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये एक अॅप इन्स्टॉल झाले. त्यानंतर त्याचे व्हाॅट्सअॅप बंद झाले. काही क्षणातच त्याच्या बँक खात्यातून ७.७२ लाख रुपये वजा झाल्याचा संदेश त्याला आला. तक्रारदाराने या प्रकरणी संबंधित बँककडे चौकशी केली असता, त्याच्या खात्यातून वरील रक्कम वजा झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तक्रारदाराने सायबर विभागात तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक अनुष्का पैबीर यांनी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.