उपमुख्यमंत्र्यांना पर्रीकरांचा आदर्श घेण्याचा महिलेचा सल्ला
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नुकताच त्यांचा सोलापूरमधील महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून तापलेले राजकारण थंड होण्यापूर्वीच आता पुण्यातील एक महिला अजितदादांना गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याप्रमाणे काम करण्याचा सल्ला देत असताना अजितदादा त्यांना ‘‘कोण पर्रीकर ?’’, असा प्रश्न विचारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपसोबत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या अजितदादांना भाजपचे ज्येष्ठ नेते पर्रीकर माहीत नसावेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी सकाळी पुण्यातील मुंढवा भागातील उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी काही नागरिकांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. यावेळी एका महिलेने थेट ‘मनोहर पर्रीकर जसे वाहतूक पाहण्यासाठी फिरायचे, तसे तुम्ही पण फिरा’, असा सल्ला दिला. त्यावर अजित पवार, ‘कोण पर्रीकर ?’ असा प्रश्न विचारतात. त्यावर ती महिला म्हणते, ‘‘गोव्याचे माजी मुख्यमंत्री होते मनोहर पर्रीकर. ते जसे दिवसा वाहतूक बघण्यासाठी फिरायचे, तसे तुम्ही कधीतरी फिरून बघा. न सांगता भेट देत चला. तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार, असे व्हायला नको.’’
अजित पवार त्या महिलेला उद्देशून म्हणतात, ‘‘तुम्ही येण्यापूर्वी आम्ही समस्या ऐकल्या आहेत. काहींनी निवेदन दिले आहे. नागरिकांना सुविधा पाहिजेत, याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमत आहोत. त्या संदर्भात आमचे काम सुरू आहे. आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या कामांना अधिक कशी गती देता येईल, हे पाहतो.’’ थेट रस्त्यावर नागरिकांनी प्रश्न विचारल्यामुळे आणि सल्ला दिल्यामुळे अजितदादा काहीसे गडबडल्याचे पाहायला मिळाले.
क्षुल्लक टिप्पणीमुळे वाद कशाला?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजप नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यानी स्व. पर्रीकारांबद्दल अपशब्द काढलेला नाही. ‘कोण पर्रीकर?’ या साध्या टिप्पणीमुळे वादाचे कारणच नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे पदाधिकारी तथा पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी व्यक्त केली आहे.