जीसीए निवडणूक : मतदानासाठी आधार वा पासपोर्टची मूळ प्रत दाखवणे अनिवार्य

उद्या मतदान : केंद्रावर मोबाईल, कॅमेरा आणण्यास बंदी


7 hours ago
जीसीए निवडणूक : मतदानासाठी आधार वा पासपोर्टची मूळ प्रत दाखवणे अनिवार्य

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा क्रिकेट संघटणेची (जीसीए) मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या क्लबांच्या प्रतिनिधींना आधार कार्ड वा पासपोर्टची मूळ प्रत दाखवणे अनिर्वाय आहे. आधार कार्ड वा पासपोर्टची झेरॉक्स प्रत चालणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी मंगळवारी पर्वरी येथील जीसीएच्या सभागृहात मतदान घेतले जाणार आहे. जीसीएशी संलग्न असलेले १०७ क्लब मतदानात सहभागी होतील. जीसीएच्या निवडणुकीचे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचल्याने यंदा मतदान, मतमोजणी यासाठी कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.
मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत मतदान होईल. मतदान सुरू होण्यापूर्वी १०.५० पर्यंत उमेदवारांना मतदान प्रक्रिया आणि मतपेटी सील करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली जाणार आहे. सकाळी १०.५० नंतर उमेदवारांना मतदान केंद्रावर उपस्थित राहता येणार नाही. त्यांना मतदान केंद्रापासून दूर जावे लागेल. तीन वाजेपर्यंत जे मतदार रांगेत उभे असतील, त्यांनाच मतदान करता येईल. मतदानाची वेळ संपल्याची घोषणा केली जाईल. मतदान केंद्रावर मोबाईल, कॅमेरा आणण्याला बंदी आहे. मतदानासाठी विशेष मार्कर पेन मतदारांना दिला जाईल. अन्य पेनाने केलेले मतदान ग्राह्य धरले जाणार नाही, असे मतदानाच्या नियमांत स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन्ही पॅनलमधील उमेदवारांचा प्रचार शिगेला
जीसीएची निवडणूक भाजप समर्थक परिवर्तन पॅनल आणि चेतन देसाई यांचे पॅनल यांच्यामध्ये होत आहे. महेश कांदोळकर हे परिवर्तन पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, तर महेश देसाई हे चेतन देसाई पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. मतदानाला एकच दिवस शिल्लक असल्याने दोन्ही पॅनलमधील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

हेही वाचा