तक्रारदार पंचाकडून पैसे मागणारा हवालदार रूपेश मळीक निलंबित

आज जारी होणार लेखी आदेश


7 hours ago
तक्रारदार पंचाकडून पैसे मागणारा हवालदार रूपेश मळीक निलंबित

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : दोन दिवसांपूर्वी होंडा येथील पंच दीपक गावकर यांना परप्रांतियांकडून मारहाण झाली होती. सदर प्रकरण हाताळणारे वाळपई पोलीस स्थानकाचे हवालदार रूपेश मळीक यांनी दीपक गावकर यांच्याशी संपर्क साधून पैशांची मागणी केली होती. या संदर्भात उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी मळीक याच्यावर निलंबनाची कारवाई केली अाहे.
गावकर यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी कॅम्प्लास्ट कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती. सत्तरी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांना उभे केले होता. तेथे त्यांची जामिनावर सुटका झाली होती. प्रकरण मिटवण्यासाठी हवालदार मळीकने दीपक गावकर यांना वारंवार फोन करून किमान दहा हजार रुपये देण्याची मागणी केली. याबाबतची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. यानंतर पोलीस अधीक्षकांनी मळीक याच्या निलंबनाचा आदेश बिनतारी संदेशाद्वारे दिला असून सोमवारी याबाबतचा लिखित आदेश जारी केला जाणार आहे.
सरकारच्या निर्णयाबद्दल समाधान : दीपक गावकर
हवालदाराचे निलंबन झाल्यानंतर पंच दीपक गावकर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, आपल्याला मारहाण करण्यात आली होती. आपण या प्रकरणात तक्रारदार होतो तरीदेखील हवालदार रूपेश मळीक आपल्याकडेच सातत्याने फोन करून पैशांची मागणी करत होता. या प्रकरणाची सरकारने दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल समाधान वाटले.

हेही वाचा