कुलरने पेट घेतल्याने चावडी-काणकोण येथे फ्लॅटला आग

तिघांना सुखरूप काढले बाहेर : शेजाऱ्यांनी गॅस सिलिंडर हटविल्याने टळला अनर्थ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28 mins ago
कुलरने पेट घेतल्याने चावडी-काणकोण येथे फ्लॅटला आग

काणकोण : चावडी काणकोण येथील एका फ्लॅटला मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागलेल्या फ्लॅटमध्ये एक मुलगी, तर बाजूच्या फ्लॅटमध्ये एक मुलगी व तिची आई होती. शेजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले. स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडर सुद्धा बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. कूलरने पेट घेतल्याने सर्वत्र आग पसरली.

आग लागलेल्या फ्लॅटचे मालक जेराल्ड फर्नांडिस हे राजबाग येथील एका रिसोर्टमध्ये कामाला असून ते रात्रपाळीवर कामाला गेले होते. तर, त्यांची २० वर्षीय मुलगी एकटीच फ्लॅटमध्ये होती. तिने लावलेल्या कूलरने पेट घेतला व नंतर आग गाद्यांना लागली.

आग लागल्याचे सर्वप्रथम आशा नगर्सेकर या शेजारील फ्लॅटधारकाने पाहिले. इतरांना त्याची कल्पना दिल्यावर फ्लॅटमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात यश आले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अग्निशामक दलाला फोन लागत नसल्याने धुरी यांनी आपल्या वाहनाने चापोली येथे जाऊन आगीची कल्पना दिली. ड्यूटीवरील मुकेश शेट यांनी अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली. आग आटोक्यात आणण्यास अग्निशामक दलाला यश आल्याचे स्थानिक नगरसेवक रमाकांत नाईक गावकर यानी सांगितले. सदर आग रात्रीच्यावेळी लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असेही नाईक गावकर यांनी सांगितले.

आग लागल्यावर अग्निशामक दलाला पाचारण केले असता दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. फ्लॅटमधील आतील गाद्यांना आग लागली होती.

आग आटोक्यात आल्यावर अग्निशामक दलाचे जवान चापोली येथील स्टेशनवर परतले असता सुमारे दोन तासांनी पुन्हा धूर बाहेर येऊ लागल्याने अग्निशामक दलाला पुन्हा पाचारण करण्यात आले. त्यांनी बेडरूममध्ये असलेल्या पुस्तकांना लागलेली आग पुन्हा विझविली.

आगीवर नियंत्रण मिळविण्याकरीता उल्हास गावकर, तुळशीदास देसाई, संजय जाधव, प्रतिक सावंत देसाई, सुरेंद्र झरावकर, सज्जन मुडकुडकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

काणकोणचे क्षेत्रफळ मोठे असून एक अग्निशामक बंब पुरेसा नसून काणकोणात आणखीन तीन तरी अग्निशामक बंब द्यावेत, अशीही मागणी नाईक गावकर यांनी केली.

आग लागल्यावर पाणी पुरवठा करणारा हायड्रट चावडी येथे बसविलेला आहे. मात्र, तो नादुरुस्त अवस्थेत असून त्याची देखभाल करण्याची गरज आहे.

कपडे खाक, सोनेही वितळले

आगीचा भडका इतका मोठा होता की, कपाटामधील कपडे जळून खाक झाले तर सोने सुद्धा वितळून गेले. त्यामुळे फ्लॅटमालक जेराल्ड फर्नांडिस यांचे लाखोचे नुकसान झाले. सरकारने त्यांना सहाय्य करावे, अशी मागणी इतर फ्लॅटधारकांनी केली आहे.