जीसीएच्या अध्यक्षपदी महेश देसाई : परिवर्तन पॅनलचा सुपडासाफ
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) निवडणुकीत चेतन देसाई यांच्या पॅनलने भाजप पुरस्कृत ‘परिवर्तन पॅनल’चा दारुण पराभव केला. देसाई पॅनलचे सर्व सदस्य विजयी झाले. अध्यक्षपदाच्या लढतीत महेश देसाई यांनी महेश कांदोळकर यांना आस्मान दाखवले.
पर्वरीतील जीसीएच्या कार्यालयात मंगळवारी सकाळी मतदान पार पडले. या निवडणुकीत १०७ क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी ४ वा. मतमोजणी घेण्यात आली. बीसीसीआयचे सहसचिव रोहन गावस देसाई यांना नाकारत मतदारांनी चेतन देसाई आणि विनोद फडके यांच्या गटाच्या अनुभवाला स्पष्ट कौल दिला.
जीसीएची नवी कार्यकारिणी (देसाई पॅनल)
अध्यक्ष : महेश देसाई
उपाध्यक्ष : परेश फडते
सचिव : तुळशीदास शेट्ये
सहसचिव : अनंत नाईक
खजिनदार : सय्यद अब्दुल माजिद
सदस्य : महेश बेहकी
....
गोमंतकीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत यासाठी करणार प्रयत्न : महेश देसाई
भारतीय क्रिकेट संघात गोमंतकीय खेळाडूंना स्थान मिळायला हवे. आयपीएल लोकप्रिय होत आहे. आयीपीएलच्या संघात गोमंतकीय खेळाडूने स्थान मिळविले तर ती मोठी उपलब्धी ठरेल. गोमंतकीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे, असे गोवा क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेश देसाई यांनी सांगितले. निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर दै. ‘गोवन वार्ता’ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी झालेली प्रश्नोत्तरे...
प्रश्न : अध्यक्ष म्हणून कोणत्या गोष्टीला प्राधान्य असेल ?
उत्तर : मी क्रिकेटपटू आहे. रणजी स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्रिकेटच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची नितांत गरज आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्याला आणि दर्जेदार क्रिकेटपटू तयार करण्याला माझे प्राधान्य राहील.
प्रश्न : विजयाचे श्रेय कोणाला ?
उत्तर : विनोद फडके, सूरज लोटलीकर, चेतन देसाई या मातब्बरांचा आमच्या पॅनलला पाठिंबा होता. या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. माझा विजय हा क्लबांचा विजय आहे. क्लबांच्या इच्छेमुळेच मला अध्यक्षपदाचा मान मिळाला.
प्रश्न : अध्यक्ष म्हणून कार्य करताना कोणती आव्हाने आहेत ?
उत्तर : खेळाडूची संघात निवड झाली इतके पुरेसे ठरत नाही. संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी कामगिरी महत्त्वाची असते. अध्यक्ष म्हणून कार्य करताना बरीच आव्हाने निर्माण होतील. सर्व क्लबना बरोबर घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणे, हे मोठे आव्हान आहे. क्लबना उत्तमोत्तम सुविधा पुरविण्याचेही आव्हान आहे.
प्रश्न : गोमंतकीय खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी काय करणार ?
उत्तर : मी क्रिकेटपटू आहे. क्रिकेटपटू बनण्यासाठी बराच संघर्ष केला आहे. प्रशांत जोशी, दत्तराज साळगावकर, विजय चौगुले यांच्या मदतीमुळे मी रणजी स्पर्धेत खेळू शकलो. क्रिकेटपटूंना मार्गदर्शन व सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असेल. क्रिकेटपटूंसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातील. दर्जेदार प्रशिक्षकांची व्यवस्था केली मैदानांचा विकास केला जाईल. क्रिकेटपटूंनी कसून सराव केला तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यास वेळ लागणार नाही.
प्रश्न : सध्या क्रिकेट स्टेडियमचा विषय गाजत आहे. क्रिकेट स्टेडियम कुठे होईल ?
उत्तर : क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा विषय प्राधान्यक्रमात आहे. स्टेडियमसाठी धारगळची निवड झाली आहे. स्टेडियम उभारण्यासाठीचे सोपस्कारही झाले आहेत. धारगळची जागा योग्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. बीसीसीआयकडून निधी मिळाला व आवश्यक ते परवाने मिळाले की, स्टेडियमचे काम सुरू होईल. सरकारचे सहकार्य मिळाल्यास स्टेडियम उभा राहण्यास वेळ लागणार नाही.
प्रश्न : मावळींगे येथे स्टेडियम होऊ शकत नाही का ?
उत्तर : ज्या जागेला क्लबांची मान्यता असेल, त्या ठिकाणी स्टेडियम होईल. जीसीएच्या आमसभेने धारगळ येथे स्टेडियमसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे धारगळ येथे काम सुरू झाले आहे. स्टेडियमच्या जागेबाबत आमसभेत पुन्हा ठराव घेतला जाईल. क्लबांच्या पसंतीप्रमाणे स्टेडियमसाठी जागेची निवड केली जाईल.
प्रश्न : जीसीएच्या व्यवस्थापनात सुधारणा करणार का ?
उत्तर : जीसीएचे नियम व कायद्याचा अभ्यास करून आवश्यकतेनुसार बदल केला जाईल. कामकाज चालविण्यासाठी सचिव, खजिनदार व इतर सदस्य आहेत. या सर्वांशी चर्चा करून जीसीएचे व्यवस्थापन चालविले जाईल.