वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष : पावसामुळे ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात अडचणी
पेडणे तालुक्यातील शेतात भटकत असलेला ओंकार हत्ती.
......
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरून गोव्याच्या हद्दीत आलेला ‘ओंकार’ हत्ती सध्या कडशी-मोपा येथेच तळ ठोकून आहे. गोव्यातून त्याला हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मूळ कळपात त्याला स्वीकारले जात नसल्याने त्याची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.
‘ओंकार’ जरी बहुतांश वेळ रानात भटकत असला, तरी अधूनमधून तो कडशीतील बागायतीचे नुकसान करत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, तो कडशी नदीत मनसोक्तपणे डुंबण्याचा आनंदही घेत आहे. गोव्याची हद्द ओलांडूनही तो पुन्हा परत आल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत.
या हत्तीवर वन खात्याच्या पथकाने ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले आहे; मात्र पावसामुळे ड्रोनचा सिग्नल मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हत्तीवर नजर ठेवणेही कठीण बनले आहे. वन विभागाचे अधिकारी जीस वर्की यांनी सांगितले की, ओंकार हत्ती पुन्हा माघारी फिरल्याने त्याला सहजासहजी हाकलून लावता येणार नाही. मात्र वन खात्याकडून त्याला पुन्हा परत पाठवण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.
ओंकार हत्तीने आता कडशी-मोपा परिसरात चांंगलेच बस्तान बसविले आहे. दोन दिवसांंच्या वास्तव्यामुळे पाण्याची ठिकाणे, तसेच खाद्याची ठिकाणे त्याने हेरून ठेवली आहेत. लोकवस्ती नसल्याचे पाहून तो केळींवर ताव मारतो व बागायतीची हानी करतो. बुधवारी त्याने परिसरातील बऱ्याच प्रमाणात बागायतीची हानी केली. मूळ कळपात त्याला घेतले जात नसल्याने तो मोपा परिसरात बस्तान बसवण्याची दाट शक्यता आहे.
हत्ती बिथरणार नाही याची काळजी घेणे आवश्यक : वनपाल
हत्तीला परतवण्याचे प्राथमिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. घाबरून हत्ती बिथरला तर त्याच्यापासून धोका निर्माण होण्याची भीती आहे. यामुळे हत्तीच्या हालचालींवर नजर ठेवून त्याला परतवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यानी दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ग्रामस्थांनी हत्ती बिथरणार नाही याची काळजी घ्यावी. भीती न बाळगता सावधानतेने व्यवहार करण्याची गरज आहे. ग्रामस्थ शांंत राहतील, तेवढे वन खात्याच्या पथकाला काम करणे सोपे होईल, असे वनपाल नवीन कुमार म्हणाले.