पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पणजीत सेवा पखवाडाचा शुभारंभ
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथे झालेल्या भाषणात स्वदेशीचा नारा दिला आहे. गोव्यातील व्यापारी तसेच ग्राहकांनीदेखील स्वदेशी बनावटीच्या मालालाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बुधवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. तत्पूर्वी सेवा पखवडा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमात विविध महिला स्वयंसाहाय्य गटांना सन्मानित करण्यात आले.
कला अकादमी येथे बुधवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, मुख्य सचिव कांडावेलू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री बाबूश मॉन्सेरात, सुभाष शिरोडकर, रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई, सुदिन ढवळीकर, नीळकंठ हळर्णकर, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, महापौर रोहित मॉन्सेरात उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण भारत करण्यासाठी स्वदेशीचा पुरस्कार करणे आवश्यक आहे. गोव्यातील व्यापाऱ्यांनी ‘आपण स्वदेशी मालाची विक्री करतो’ हे अभिमानाने सांगितले पाहिजे. रोजच्या वापराच्या वस्तूपासून ते लक्झरी वस्तूपर्यंत सर्व गोष्टी स्वदेशी असाव्यात. स्वदेशी वस्तूंमध्ये येथील लोकांचे कष्ट असतात. ग्राहकांनीदेखील स्वदेशी वस्तू खरेदी केल्यास याचा फायदा देशातील लोकांनाच होईल.
याशिवाय पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी विविध योजनांचा शुभारंभ केला आहे. यातील ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजनेअंतर्गत राज्यभरतील प्राथमिक आरोग्य केंद्रांत महिलांसाठी मोफत आरोग्य तपसणी शिबिरे आयोजित केली जातील. मोफत उपचार व औषधेही देण्यात येणार आहेत. ‘मातृ वंदना’ योजनेनुसार पहिल्या मुलीला जन्म देणाऱ्या मातेला ५ हजार, तर दुसऱ्या मुलीला जन्म देणाऱ्या मातेला ६ हजार रुपये दिले जात आहेत. आजच गोव्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
महिलांना ६२ कोटींची कर्जे वितरीत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, ग्रामीण विकास खात्यातर्फे बुधवारी महिला स्वयंसाहाय्य गटांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. आजपर्यंत राज्यातील ५० हजार महिलांना ३५० कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. याशिवाय वाहन खरेदीसाठी २.१ कोटी व अन्य निधीच्या स्वरूपात ६ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
डबल इंजिनमुळेच गोव्याचा विकास
मुख्यमंत्री म्हणाले की, मागील काही वर्षांत गोव्यात मूलभूत सुविधांसह अन्य क्षेत्रांत प्रगती झाली आहे. गोव्यात याआधी झाला नव्हता तेवढा विकास मागील ११ वर्षांत झाला. केंद्र आणि राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार असल्यामुळेच हा विकास शक्य झाला आहे.