बाप्पाच्या कृपेने बीएमडब्ल्यू, ३५ लाखांची भेट

निरंकालच्या संदेशला पावला ‘केपेचा गणपती’

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
47 mins ago
बाप्पाच्या कृपेने बीएमडब्ल्यू, ३५ लाखांची भेट

पणजी : श्री गणेश चतुर्थी उत्सवाचा निरोप देताना भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष केला. या उत्सवाने केवळ भक्तीचा माहोलच नाही तर अनेकांच्या आयुष्यात भाग्याची उधळणही करून दिली आहे. बाप्पाच्या कृपेने गोव्यातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या महाप्रसाद पावती कुपनांच्या लॉटर्‍यांतून अनेकांना मोठी बक्षिसे मिळाली असून, त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

केपेतील सुप्रसिद्ध सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या महाप्रसाद पावतीच्या पहिल्या बक्षीसाचा मान सातेरीमळ, निरंकाल फोंडा येथील संदेश नाईक यांना मिळाला. बक्षीस म्हणून त्यांना थेट बीएमडब्ल्यू ५३० LI व ३५ लाख रुपये प्राप्त झाले. “ही तर श्री गणेशाची अपार कृपा आहे. साध्या नोकरीत असतानाच बाप्पाने आपल्यावर अशी कृपा केली याचा मनापासून आनंद आहे,” असे आनंदाने ओथंबून आलेले संदेश नाईक यांनी दै. ‘गोवन वार्ता’ ला सांगितले. 

कुडचडे येथील एका लहान मुलीने साठवून ठेवलेले पैसे आपल्या वडिलांकडे देऊन हट्टाने केपे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे महाप्रसाद कुपन घ्यायला सांगितले आणि बाप्पा ही या लहान मुलीला पावला. तिला केपे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या महाप्रसाद पावती कुपनातील मारुती सुझुकी डिझायर ही कार लागली. 

तर, सांगे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या लाॅटर्‍यांतून एका होमगार्डला थेट फ्लॅट व ३५ लाख रुपयांची भेट मिळाली. साधारण घरच्या परिस्थितीत असताना अचानक मिळालेल्या या बक्षिसामुळे त्यांच्याही कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

गणरायाच्या कृपेने अशा स्वरूपात अनेकांच्या आयुष्यात समृद्धीचा मार्ग खुला झाला आहे. कुणाला बीएमडब्ल्यू, कुणाला फ्लॅट, तर कुणाला कार – अशी बक्षिसे लाभल्यामुळे गोव्याच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा रंगली आहे.

गणेशोत्सव संपला असला तरी बाप्पा जाताना भक्तांच्या जीवनात आनंद, समाधान आणि भाग्याची उधळण करून गेले, हेच खरे!

हेही वाचा