केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार योजनेचा शुभारंभ : मुख्यमंत्र्यांची माहिती
पणजी: ‘म्हजे घर’ योजनेशी संबंधित अधिसूचना जारी होण्यास सुरुवात झाली असून, या योजनेचा जवळपास ५० टक्के गोमंतकीयांना लाभ होणार आहे. या योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
सरकारी जमिनींवरील घरे अधिकृत करण्याची अधिसूचना आतापर्यंत जारी करण्यात आली. यानंतर वीस कलमी कार्यक्रमांतर्गत बांधलेली घरे अधिकृत करणारी अधिसूचनाही जारी झाली आहे. उर्वरित अधिसूचना जारी झाल्यानंतर लवकरच अर्ज वितरीत केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोमुनिदाद जमिनींवरील अनधिकृत घरे आणि सरकारी जमिनींवरील अनधिकृत घरे नियमित करण्याची तरतूद असलेली वेगवेगळी विधेयके पावसाळी अधिवेशनात संमत झाली होती. राज्यपालांच्या मान्यतेनंतर त्यांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या नव्या कायद्यामुळे कोमुनिदाद, सरकारी आणि इतर मिळून सुमारे एक लाखाहून अधिक अनधिकृत घरे अधिकृत होणे शक्य होणार आहे. सरकारी जमिनींवरील घरे अधिकृत करण्याबाबतच्या नियमांचा मसुदा सूचनांसाठी जाहीर करण्यात आला आहे.