तिसवाडी : फोन्तेन्हासमधील पर्यटकांच्या उपद्रवाबद्दल चार तक्रारी

पणजी महानगरपालिकेकडे स्थानिकांचे गाऱ्हाणे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
42 mins ago
तिसवाडी : फोन्तेन्हासमधील पर्यटकांच्या उपद्रवाबद्दल चार तक्रारी

पणजी : फोन्तेन्हास आणि साओ तोमे भागातील पर्यटकांच्या उपद्रवाबाबत पणजी महानगरपालिकेकडे चार तक्रारी आल्या आहेत. या भागात शिस्त राखण्यासाठी संवर्धन नियम लागू करण्यात आले आहेत, असे शहर विकास खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पणजी शहरातील सांत इनेज आणि साओ तोमे भागातील वारसा घरे आणि लॅटिन क्वार्टर्सचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात. या भागात फोटो किंवा रील्स बनवताना स्थानिकांना अडथळे येतात. पर्यटक येथे आरडाओरडा करतात, घरांवर पाय ठेवून फोटो काढतात, कुठेही वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात अशा अनेक तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत.

पर्यटन खात्यासह पणजी महानगरपालिकेकडे तक्रारी आल्या आहेत. आतापर्यंत महानगरपालिकेकडे चार तक्रारी आल्या असून त्यापैकी दोन पुढील कारवाईसाठी पर्यटन खात्याकडे पाठवण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

फोन्तेन्हास आणि साओ तोमे भाग संरक्षित क्षेत्राअंतर्गत येतो. गोवा जमीन विकास आणि इमारत बांधकाम कायदा २०१० च्या ६ ब अंतर्गत हे क्षेत्र संवर्धित क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे आणि या कायद्यानुसार संवर्धन नियम लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा