म्हणाले-'भाजपतर्फे स्वागताचा प्रस्ताव आल्यास प्रवेशासाठी तयार'
पणजी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपमध्ये 'घरवापसी' करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मी तयार आहे, फक्त पक्षातर्फे स्वागताचा प्रस्ताव यायला हवा, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पार्सेकर म्हणाले की, माझ्या घरवापसीबद्दल पक्षाच्या प्रमुखांना विचारणे योग्य ठरेल. जर भाजपमधून स्वागताचा प्रस्ताव आला, तर मी नक्कीच पक्षात परत येण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.
'प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असते'
भाजपमध्ये परत येण्यास उशीर झाला का, या प्रश्नावर पार्सेकर म्हणाले की, प्रत्येक गोष्टीसाठी एक निश्चित वेळ असते. आपण मुहूर्त पाहतो आणि ज्या गोष्टी व्हायच्या असतात, त्या त्याच मुहूर्तावर होतात. मला कोणीही घरातून बाहेर काढले नाही, त्यामुळे माझा कोणावरही राग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्हायरल फोटोवर दिले स्पष्टीकरण
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्यासोबतचा गणेश चतुर्थीमधील फोटो व्हायरल झाल्याच्या प्रश्नावर पार्सेकर यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, चतुर्थीच्या दिवशी जीत आरोलकर घरी आले होते. त्यावेळी मी जेवण करायला बसणार होतो, म्हणून मी त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आणि ते स्वीकारून ते माझ्यासोबत जेवायला बसले. तेव्हाच एका व्यक्तीने चलाखीने तो फोटो काढून व्हायरल केला.
यावेळी त्यांनी मांद्रे मतदारसंघात भाजपची सध्याची स्थिती कशी आहे, यावर भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले की, मी घराबाहेर असल्याने घराच्या स्थितीवर वक्तव्य करणे योग्य नाही. जर 'घरवापसी' झाल्यावर मला कोणती जबाबदारी दिली, तरच मी त्यावर भाष्य करेन.