वर्चस्वासाठी दोन पॅनेलमध्ये थेट लढत; उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणी, मात्र फेरमोजणी नाही.
पणजी: गोवा क्रिकेट संंघटनेचे अध्यक्ष व इतर पदांंसाठी उद्या १६ रोजी निवडणूक होणार असल्याने जीसीएवर कोणाचे वर्चस्व राहील, हे उद्या ठरणार आहे. यंदा भाजप समर्थक ‘परिवर्तन पॅनेल’ आणि ‘चेतन देसाई पॅनेल’ यांच्यात थेट लढत होत आहे. अध्यक्षपदासाठी महेश कांदोळकर आणि महेश देसाई या दोनच उमेदवारांमध्ये चुरस आहे.
‘परिवर्तन पॅनेल’ने निवडून आल्यास २०२७ पर्यंत म्हावळिंगे येथे क्रिकेट स्टेडियम उभारण्याचे आश्वासन दिले आहे. यावर प्रत्युत्तर देताना ‘चेतन देसाई पॅनेल’ने सर्व परवानग्या मिळाल्यास स्टेडियम कोठेही उभारणे सहज शक्य असल्याचे म्हटले आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी मतदान करणाऱ्या १०७ क्लबच्या सदस्यांची भेट घेतली.
मतमोजणी उमेदवारांच्या उपस्थितीत
निवडणूक अधिकारी ए. के. ज्योती यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मतदान झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. ही मतमोजणी उमेदवारांच्या उपस्थितीत केली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत फेरमोजणी केली जाणार नाही. जर दोन उमेदवारांना समान मते मिळाली, तर लॉटरीच्या पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल.
निवडणुकीतील उमेदवार पुढीलप्रमाणे
अध्यक्ष: महेश देसाई आणि महेश कांदोळकर
उपाध्यक्ष: परेश फडते आणि राजेश पाटणेकर
सचिव: दया पागी, हेमंत पै आंगले आणि तुळशीदास शेट्ये
सहसचिव: अनंत नाईक आणि सुशांत नाईक
खजिनदार: रुपेश नाईक आणि सय्यद माजीक
सदस्य: महेश बेहेकी आणि मेघनाथ शिरोडकर