पणजी : डिसेंबरपर्यंत गोव्यासाठी स्वतंत्र क्रीडा धोरण : डॉ. अजय गावडे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
38 mins ago
पणजी : डिसेंबरपर्यंत गोव्यासाठी स्वतंत्र क्रीडा धोरण : डॉ. अजय गावडे

पणजी: राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या धर्तीवर येत्या डिसेंबरपर्यंत गोव्यासाठी स्वतंत्र क्रीडा धोरण आणले जाईल. यासाठी क्रीडा क्षेत्रातील सर्व भागधारकांना विश्वासात घेऊनच काम होईल अशी माहिती क्रीडा संचालक डॉ. अजय गावडे यांनी दिली. सोमवारी त्यांनी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, केंद्र सरकारने 'राष्ट्रीय खेल नीती २०२५' जारी केली असून, राज्यांना स्वतःचे क्रीडा धोरण तयार करण्यास सांगितले आहे. त्यानुसार गोव्यासाठी नवीन धोरण तयार केले जाईल, ज्यात प्रशिक्षक, संघटना, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी अशा सर्वांची मते विचारात घेतली जातील. सध्या राज्यात २००९ चे क्रीडा धोरण लागू आहे, पण गेल्या १६ वर्षांत क्रीडा क्षेत्रात बरेच बदल झाल्याने नवीन धोरण आणणे आवश्यक आहे.

डॉ. गावडे पुढे म्हणाले की, गोव्याच्या क्रीडा प्रगतीसाठी क्रीडा खाते आणि क्रीडा प्राधिकरणाने यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. दोन्ही विभाग एकत्र येऊन जबाबदारी सांभाळतील. प्राधिकरणाकडे चांगले प्रशिक्षक आहेत, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाईल. राज्यात क्रीडा पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

सर्व तालुक्यात 'खेलो गोवा' केंद्रे

'खेलो इंडिया' केंद्रांच्या धर्तीवर राज्यातील सर्व तालुक्यात लवकरच 'खेलो गोवा' क्रीडा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, काही कारणांमुळे बंद असलेले क्रीडा पुरस्कार या वर्षापासून पुन्हा सुरू केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

क्रीडा सुविधांच्या देखभालीसाठी आराखडा

राज्यातील सर्व क्रीडा संकुल आणि इतर सुविधांच्या देखभालीसाठी एक विशेष आराखडा तयार केला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर या सुविधा पीपीपी तत्त्वावर किंवा क्रीडा संघटनांना देण्याबाबत विचार केला जाईल, असे डॉ. गावडे यांनी स्पष्ट केले.