अन्यायाविरुद्ध एकवटला भंडारी समाज

हरवळे येथे बैठक : १२ ऑक्टोबर रोजी राज्याती​ल लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार

Story: विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th September, 11:55 pm
अन्यायाविरुद्ध एकवटला भंडारी समाज

हरवळे येथे गोमंतक भंडारी समाज बांधवांच्या बैठकीत उपस्थित विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबत माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, महादेव नाईक व इतर.

पेडणे : गोव्यामध्ये बहुसंख्येने असलेल्या भंडारी समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी यापुढे सामाजिक चळवळ उभी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. समाजातील विविध स्तरांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि समाजाला विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी एकसंघ राहून काम करण्याचा निर्धार भंडारी समाजबांधवांनी केला आहे. या एकजुटीतूनच १२ ऑक्टोबर रोजी साखळी येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष आणि जिल्हा पंचायत सदस्य अशा सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांचा गौरव केला जाईल.
या सामाजिक चळवळीची दिशा ठरवण्यासाठी हरवळे येथील देवस्थान सभा मंडपात समाजातील नेते आणि विविध राजकीय पक्षांतील प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, दिलीप परुळेकर, जय साळगावकर, माजी आमदार किरण कांदोळकर, श्याम सातार्डेकर, जिल्हा पंचायत सदस्य कार्तिक कुडणेकर, रंगनाथ कलशावकर तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर, मशाल आडपईकर, नगरसेवक तारक आरोलकर, दीपक कळमकर, उमेश तळवणेकर, रघुनाथ ऊर्फ भाई नाईक यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार किरण कांदोळकर यांनी, रुद्रेश्वर देवाच्या पालखीला राज्यभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून समाजाच्या एकजुटीची ताकद दिसून आल्याचे सांगितले. आपण विविध राजकीय पक्षांत असलो तरी, समाज म्हणून आपण एकसंघ राहून समाजाच्या उत्कर्षासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
पालखीचा मान प्रत्येक तालुक्याला
समाजाला एकत्र आणण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांचाही उपयोग करण्याचे ठरवण्यात आले. यापुढे हरवळे देवाचा पालखी उत्सव प्रत्येक तालुक्यातील समाजबांधवांना घेता येणार आहे. दर महिन्याला एका तालुक्यात हा पालखी उत्सव आयोजित केला जाईल, अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
मे महिन्यात भव्य मेळावा
समाजबांधवांमध्ये अधिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि त्यांना अधिक एकसंघ करण्यासाठी आगामी काळात भव्य मेळावा आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. हा मेळावा मे महिन्यात घेतला जाईल, असे जाहीर करण्यात आले. या मेळाव्यामुळे समाजातील सर्व घटकांना एकत्र येण्याची आणि भविष्यातील वाटचाल निश्चित करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.