काँग्रेसला मत देणे म्हणजेच भाजपला मत!

आमदारांच्या बंडखोरीवरून वाल्मिकी नाईक यांची काँग्रेसवर टीका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th September, 11:45 pm
काँग्रेसला मत देणे म्हणजेच भाजपला मत!

पत्रकार परिषदेत बोलताना वाल्मिकी नाईक. सोबत इतर.

मडगाव : २०१७ मध्ये निवडून आलेल्या १७ पैकी १५ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करूनही काँग्रेसने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्याऐवजी काँग्रेसने जनतेची केवळ दिशाभूल करण्याचे काम केले आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे (आप) गोवा कार्याध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केली. काँग्रेसला मत देणे म्हणजे भाजपला मत देणे आहे, असेही ते म्हणाले.
मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. यावेळी त्यांच्यासोबत आपचे सरचिटणीस संदेश तळेकर, उपाध्यक्ष रॉक मास्कारेन्हास आणि प्रवक्ते पिओ केविन उपस्थित होते.
आमदारांनी केलेल्या गद्दारीनंतर काँग्रेसने धार्मिक स्थळांवर जाऊन पक्ष सोडणार नसल्याची शपथ घेतली आणि निष्ठा प्रतिज्ञापत्रे घेण्याचे ढोंग केले, असा आरोप वाल्मिकी नाईक यांनी केला. त्यांनी काँग्रेस उमेदवारांनी सही केलेली प्रतिज्ञापत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली. आपच्या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रे देऊन त्यांच्या प्रती घरोघरी दिल्या होत्या, जेणेकरून एखाद्या आमदाराने गद्दारी केल्यास मतदार त्याच्यावर खटला दाखल करू शकेल. जर काँग्रेसची प्रतिज्ञापत्रे खरी असतील, तर त्यांनी त्यांच्या आमदारांविरोधात केस का दाखल केली नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. २०२२ च्या निवडणुकीपूर्वी मुरगावचे काँग्रेस उमेदवार संकल्प आमोणकर यांच्या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओने भाजप-काँग्रेसची 'सेटिंग' उघड केली होती, असेही नाईक यांनी सांगितले.
आपचे सरचिटणीस संदेश तळेकर यांनी दिल्ली निवडणुकीचा संदर्भ देत काँग्रेसवर निशाणा साधला. दिल्ली निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर आपचा पराभव करण्यासाठी लढवली, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या रणनीतीला मान्यता दिल्यामुळे ते भाजपसोबत असल्याचे स्पष्ट होते, असे तळेकर म्हणाले. त्यांनी दावा केला की, आपने निवडणुकीवर १४ कोटी रुपये खर्च केले, तर काँग्रेसने ४६ कोटी रुपये केवळ आपचा पराभव करण्यासाठी खर्च केले.

वाल्मिकी नाईक राष्ट्रीय प्रवक्ते
वाल्मिकी नाईक यांची आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संबंधीचा आदेश पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. संदीप पाठक यांनी रविवारी जारी केला.