पणजी: गोव्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. विविध भागात दिवसभर मध्यम ते मुसळधार सरींची नोंद झाली. हवामान खात्याने उद्या मंगळवारीही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करत 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यानंतर, १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, या दिवसांसाठी कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
सोमवारी सकाळपासूनच राजधानी पणजीत संततधार सुरू होती. त्यामुळे काही रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. पावसामुळे आणि थंड वाऱ्यामुळे कमाल तापमानात घट झाली. पणजीत कमाल ३०.४ अंश तर किमान २४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यातील सरासरीपेक्षा अधिक पाऊस
या वर्षी १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ११६.७६ इंच पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहे. यादरम्यान सांगे (१५४.२५ इंच), धारबांदोडा (१५२.६० इंच), वाळपई (१५० इंच) आणि केपे (१४२.३८ इंच) येथे सर्वाधिक पाऊस झाला आहे.
मच्छीमारांना इशारा
हवामान खात्याने मच्छीमारांसाठी इशारा जारी केला आहे. १५ ते १९ सप्टेंबर दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे या काळात मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.