रेल्वे सुरक्षा दलाकडून सहकार्य : अपना घरात रवानगी
मडगाव : रेल्वे सुरक्षा दलाला मडगाव रेल्वेस्थानकावर अल्पवयीन मुलगी आढळली. बाल मदत कक्षाच्या सहाय्याने मुलीला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर तिला मेरशी येथील अपना घर येथे पाठवण्यात आले.
मडगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ वर रेल्वे सुरक्षा दलाकडून गस्त घातली जात होती. त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी विक्रमजीत यांना एक अल्पवयीन मुलगी घाबरलेल्या स्थितीत दिसून आली. त्यांनी त्या मुलीची चौकशी केली असता तिच्या सोबत कुणीही नसल्याचे तिने सांगितले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने रेल्वे स्थानकावरील बाल मदत केंद्राला याची माहिती दिली.
त्याठिकाणी असलेल्या लक्ष्मी यादव यांनी त्या मुलीची चौकशी केली. रेल्वे सुरक्षा दल व बाल मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता सदर मुलगी ही तेरा वर्षांची असल्याचे समोर आले. ती मूळ गोरखपूर उत्तरप्रदेश येथील असून तिला सुरत येथे जायचे होते. मात्र चुकीच्या गाडीत बसल्याने ती मडगावात पोहोचल्याचे समोर आले.
यानंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून सदर मुलीच्या पालकांशी संपर्क साधून मुलगी मडगावात असल्याचे सांगण्यात आले. पालक येईपर्यंत सदर मुलीला बाल कल्याण समितीच्या ताब्यात देण्यात असून त्यांनी त्या अल्पवयीन मुलीला मेरशी येथील अपना घर येथे पाठवले आहे.