ओंकार हत्ती गोव्याच्या हद्दीबाहेर; मोपावासीयांनी टाकला सुटकेचा निश्वास

वन खात्याची ड्रोनद्वारे देखरेख

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
27 mins ago
ओंकार हत्ती गोव्याच्या हद्दीबाहेर; मोपावासीयांनी टाकला सुटकेचा निश्वास

पणजी : मोपाच्या जंगलात दाखल झालेला ओंकार नावाचा हत्ती आज सकाळीच गोव्याची हद्द ओलांडून सिंधुदुर्गात पोहोचला. त्यामुळे मोपावासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. वन खात्याच्या पथकाने ड्रोनच्या साहाय्याने हत्तीच्या हालचालीवर नजर ठेवली आहे, अशी माहिती उपवनपाल (डीसीएफ) जीस वर्की यांनी दिली.

शनिवारी रात्री ओंकार नावाचा १० वर्षांचा हा हत्ती मोपाच्या जंगलात पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. वाट चुकल्याने हा हत्ती मोपाच्या जंगलात आला होता. सिंधुदुर्ग वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तो आता खोलबागवाडी-नेतर्डे येथे पोहोचला आहे.

सकाळच्या सुमारास ड्रोन सिग्नलच्या आधारे त्याने गोव्याची हद्द ओलांडल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तो हत्ती पुन्हा गोव्यात परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपवनपाल जीस वर्की यांनी केले आहे.