फोंडा : चक्क मैदानात मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी!

म्हा्र्दोळ-कुंकळये येथील धक्कादायक प्रकार: क्लब आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
फोंडा : चक्क मैदानात मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी!

फोंडा : एका बाजूला मुलांना मोबाईल सोडून मैदानात खेळण्याचा उपदेश सरकार करते, तर दुसरीकडे त्यांचेच माहिती तंत्रज्ञान खाते क्रीडा खात्याच्या जागेतील मैदानावर मोबाईल टॉवर उभारणीस खासगी कंपन्यांना परवानगी देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हार्दोळ-कुंकळये येथील क्रीडा मैदानावर ही घटना घडली असून, येथील ग्रामस्थ आणि स्थानिक स्पोर्ट्स क्लबने याला तीव्र विरोध केला आहे.

क्रीडायुवा संचालनालयाने ताब्यात घेतलेल्या या मैदानावर खासदार निधीतून बांधकाम करण्यात आले होते आणि स्थानिक पंचायतस्पोर्ट्स क्लबकडे त्याची देखभाल सोपवण्यात आली होती. या जागेत मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी मिळाल्याने कुंकळये स्पोर्ट्स क्लबने क्रीडा संचालक डॉ. अजय गावडे यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदवला आहे. डॉ. गावडे यांनी या आक्षेपाची गंभीर दखल घेत, टॉवर उभारणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीला तात्काळ बोलावून काम थांबवण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.

पर्यायी जागा दाखवा, अन्यथा पोलीस संरक्षणात मंजूर जागेवर टॉवर उभारू असा पवित्रा कंपनीचे प्रतिनिधी घेत आहेत. यावर स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली असता, त्यांनी मी यात काही करू शकत नाही, दुसरी जागा दाखवा असे सांगत हात वर केले असल्याची माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या सरकारी मंजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात लपवाछपवी झाल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. माहिती तंत्रज्ञान खात्याने ऑक्टोबर २०२४ पासून पत्रव्यवहार सुरू केला होता. जागा निश्चितीसाठी संयुक्त पाहणी करण्याची जबाबदारी फोंडा तालुका सहाय्यक शारीरिक शिक्षण अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली होती, परंतु त्यांनी याबाबतचा कोणताही अहवाल मुख्यालयाला दिला नसल्याचा आरोप आहे. दरम्यान, मोबाईल टॉवरच्या मंजूर ठिकाणाची गुगल इमेज सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, क्रीडाप्रेमींकडून यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.