पार्किंगच्या जागेवर पुष्पचक्र अर्पण करून निषेध; 'हा प्रकल्प अकार्यक्षमतेचे स्मारक' : प्रभव नायक
मडगाव: मडगाव बहुमजली पार्किंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन १५ सप्टेंबर २०१५ रोजी झाले होते. पण, दहा वर्षांनंतरही या प्रकल्पाची एकही वीट बसवली गेली नाही, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. मडगावला या प्रकल्पातून केवळ आश्वासनेच मिळाली, असे मत प्रभव नायक यांनी व्यक्त केले.
पार्किंगच्या शिलान्यासाच्या १० व्या वर्धापन दिनी या लाजिरवाण्या प्रतीकावर पुष्पचक्र अर्पण करून नायक यांनी आपला निषेध नोंदवला. मडगावकरांना वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येतून दिलासा मिळेल, असे आश्वासन या प्रकल्पाद्वारे देण्यात आले होते, परंतु गेल्या दहा वर्षांत फक्त पोकळ आश्वासनेच दिली गेली.
या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यात दरवर्षी येणारे अपयश हे नगरपालिकेच्या अकार्यक्षमतेचा उघड पुरावा आहे. हे पार्किंग कॉम्प्लेक्स आता अकार्यक्षमतेचे स्मारक बनले असून, लोकांच्या अपेक्षा शिलान्यासाच्या दगडाखाली गाडल्या गेल्या आहेत. मडगाववासियांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरवणे ही पालिका आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.