डीएलएफ प्रकल्पाच्या क्षेत्रात २४ हजार चौ.मी.ने वाढ

रेईस मागुस येथे नवीन प्रकल्पाची नोंदणी : खर्च ४४३ कोटींवरून १,५३६ कोटींवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
49 mins ago
डीएलएफ प्रकल्पाच्या क्षेत्रात २४ हजार चौ.मी.ने वाढ

पणजी : ‘डीएलएफ’ने रेईस मागुस टेकडीवरील रद्द केलेल्या मेगा प्रकल्पाचे नाव बदलून पुन्हा नव्याने प्रकल्प सुरू केला आहे. या नवीन प्रकल्पाला गेल्या मंगळवारी गोवा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाची (रेरा) मान्यता मिळाली आहे. याव्यतिरिक्त, नवीन मान्यतेनुसार, या प्रकल्पाचे क्षेत्रफळ २४ हजार चौ.मी. वाढले आहे, अशी माहिती ‘रेरा’ने दिली आहे.

मांडवी नदीच्या किनाऱ्यावर टेकडीवर येणाऱ्या ‘द बे व्ह्यू’ प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्यासाठी डीएलएफने गोवा रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाकडे (रेरा) अर्ज केला. प्रकल्पाच्या आराखड्यात सुधारणा करून नव्याने प्रकल्पाची नोंदणी करण्यासाठी आधीची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज केला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

आधी प्रकल्प रद्द, नंतर नव्याने नोंदणी

- ४ जुलै २०२५ रोजी डीएलएफने ‘रेरा’कडे आपला ‘द बे व्ह्यू’ प्रकल्प मागे घेण्यासाठी किंवा त्याची नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला होता.
- हा प्रकल्प मागे घेण्यासाठी किंवा त्याची नोंदणी रद्द करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला किंवा कायदेशीर संस्थेला आक्षेप असल्यास १५ दिवसांच्या आत आपले आक्षेप सादर करण्यास सांगितले होते.
- त्यानंतर १३ ऑगस्ट २०२५ रोजी ‘रेरा’ने या प्रकल्पाची मान्यता रद्द केली.
- डीएलएफने पुन्हा त्याच ठिकाणी नवीन प्रकल्पासाठी अर्ज केला असून या नवीन प्रकल्पाला ९ सप्टेंबर २०२५ रोजी मान्यता मिळाली आहे.

‘द बे व्ह्यू’चे झाले ‘बे व्ह्यू इस्टेट’

रेईस मागुसच्या सर्व्हे क्र. ८७/१-अ-१, ८७/१-अ-२ आणि ८७/१-अ-३ असलेल्या ठिकाणीच हा प्रकल्प नव्याने येत आहे. आधीच्या प्रकल्पाचे नाव ‘द बे व्ह्यू’ होते, त्याचे नाव बदलून ‘बे व्ह्यू इस्टेट’ झाले आहे. पूर्वीच्या प्रकल्पाचे क्षेत्रफळ १,०६,३४६ चौ.मी. इतके होते आणि आता नवीन प्रकल्पाचे क्षेत्रफळ १,३०,४८५ चौ.मी. पर्यंत वाढले असून २४,१३9 ची अतिरिक्त वाढ झाली आहे. पूर्वीच्या प्रकल्पाचा खर्च ४४३ कोटी इतका होता, तो आता बराच वाढून १,५३६ कोटींपर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती ‘रेरा’कडे केलेल्या अर्जातून मिळाली आहे.

हेही वाचा