कमाल तापमानात घट : काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम
पावसाच्या सरींमुळे फेरीबोटीतील प्रवाशांना छत्रीचा आधार घ्यावा लागला. (नारायण पिसुर्लेकर)
पणजी : सोमवारी राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. विविध भागात संध्याकाळपर्यंत मध्यम ते मुसळधार सरींची नोंद झाली. हवामान खात्याने मंगळवारी देखील जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करत यलो अलर्ट जारी केला आहे. तर १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पाच दिवसांसाठी पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
राजधानी पणजीत सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. संततधार पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचून राहिले. काही रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा झाला. पाऊस आणि थंड वाऱ्यामुळे कमाल तापमानात घट झाली. पणजीत कमाल २६.८ अंश व किमान २४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३० अंश व किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस राहिले.
राज्यात १ जून ते १५ सप्टेंबर दरम्यान सरासरी ११६.७६ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३.६ टक्क्यांनी अधिक आहे. यादरम्यान सांगेत १५४.२५ इंच, धारबांदोडात १५२.६० इंच, वाळपईत १५० इंच, केपेत १४२.३८ इंच, फोंड्यात १२४.७७ इंच, साखळीत १२०.७० इंच, पेडण्यात ११४.४० इंच, काणकोणमध्ये १११.९५ इंच, जुने गोवेत ११०.७६ इंच, तर म्हापशात ९८.४२ इंच पावसाची नोंद झाली आहे.
मच्छीमारांना इशारा
राज्यात १५ ते १९ सप्टेंबर दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ६५ किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
पाऊस हंगामी सरासरीजवळ
हवामान खात्याकडून १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाला हंगामी पाऊस असे म्हटले जाते. राज्यात हंगामी पावसाची सरासरी ११८.४२ इंच आहे. यंदा १५ सप्टेंबर पर्यंत ११६.७६ इंच पावसाची नोंद झाली आहे. यामुळे यंदा सप्टेंबर महिना पूर्ण होण्याआधीच हंगामी सरासरी पूर्ण होण्याची शक्यता आहे.