‘डिजिटल अरेस्ट’द्वारे ८० लाखांना गंडविणाऱ्या युवकाला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
42 mins ago
‘डिजिटल अरेस्ट’द्वारे ८० लाखांना गंडविणाऱ्या युवकाला अटक

पणजी : काणकोण तालुक्यातील एका व्यक्तीला हिंदू धर्माविरोधात संदेश पाठवल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ८० लाखाचा गंडा घालण्यात आल्याच्या प्रकरणात सायबर गुन्हा विभागाने आनंद कुमार वर्मा (१९, नागपूर, महाराष्ट्र) याला अटक केली आहे. अटक केलेल्या युवकाच्या बँक खात्यात वरील रकमेपैकी २० लाख रुपये जमा झाले होते.
या प्रकरणी लोलये- काणकोण येथील एका नागरिकाने सायबर विभागात तक्रार दाखल केली. त्यांना एनसीआरबी आणि साहर पोलीस स्थानकाचा अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने १८ जुलै रोजी व्हॉट्सअॅप कॉल केला. तक्रारदाराच्या आधार कार्डचा वापर करून एक मोबाईल क्रमांक घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच त्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून हिंदू धर्माविरोधात संदेश पाठवल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात वरील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. याच दरम्यान तक्रारदाराला वेगवेगळे तपास अधिकारी असल्याचे भासवून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले. हे प्रकरण मिटविण्यासाठी संशयितांनी तक्रारदाराला १८ जुलैपासून वेगवेगळ्या चार बँक खात्यांमध्ये मिळून ८० लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्यात आला. याच दरम्यान वरील रकमेतील २० लाख रुपये नागपूर - महाराष्ट्र येथील एका बँकेत जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि साहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी याच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक अनुष्का पै बीर याच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक शेर्व्हीन दा कोस्टा, काॅन्स्टेबल संजीव गावस आणि सुनील रैनाटी यांचे पथक बुधवारी, १० रोजी नागपुरात रवाना झाले. त्यानंतर पथकाने संशयित आनंद कुमार वर्मा या युवकाचा मुसक्या आवळल्या. त्यानंतर संशयिताला गोव्यात आणून कारवाई केली.