उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्णय : सांगोल्डा बायपास ते ओ कोकेरो जंक्नशनपर्यंतचा महामार्ग होणार बंद
म्हापसा : पर्वरी येथील सहा लेनच्या एलिवेटेड कॉरिडॉर उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामामुळे पणजी ते म्हापशाकडील वाहतुकीसाठी सांगोल्डा बायपास रस्ता आणि ओ कोकेरो ते आराडी पर्वरी जुना बाजार जंक्शन हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्णय पीडब्ल्यूडीने घेतला आहे. बुधवार दि. १७ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान वरील मार्गावरील वाहतूक ही सांगोल्डाहून चोगम रस्त्यावर वळवण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ता, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार याबाबतची सार्वजनिक नोटीस सावर्जनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवार दि. १६ रोजी जारी केली आहे. नोटिसीनुसार महामार्ग आणि सांगोल्डा बायपास रस्त्यावरून वाहतूक करणारी पणजी ते म्हापसा दरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक ही चोगम रस्त्यावर वळविण्यात येणार आहे, तर म्हापसा ते पणजी मार्गावरील वाहतूक विद्यमान मार्गानेच म्हणजे जुना बाजार जक्शन ते ओ कोकेरो आणि सांगोल्डा बायपास रस्त्यावरूनच चालणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग बंद असलेल्या भागात स्थानिक रहिवासी व आस्थापनांसाठी योग्य आणि सुरक्षित प्रवेश निश्चित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. शिवाय आयआरसी आणि रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व आवश्यक रस्का सुरक्षा उपायांव्यतरिक्त कंत्राटदार एजन्सीकडून आवश्यक ठिकाणी डायव्हर्जन मार्ग, नो पार्किंग आणि दिशादर्शक फलक लावले जातील, असे या नोटिसीमध्ये पीडब्ल्यूडीने नमूद केले आहे.
दरम्यान, काम पुढे जाईल तसतसे वाहतुकीत वेळोवेळी बदल करण्यात येतील, असे पीडब्ल्यूडीतील सूत्रांनी सांगितले.
कमान उभारताना खबरदारी...
या एलिवेटेड कॉरिडॉरचे काम जलदगतीने सुरू असून पर्वरी जुना बाजार जंक्शन ते सांगोल्डा बायपास जंक्शन दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या खांब क्रमांक ८ ते खांब क्रमांक १८ दरम्यानच्या भागात कमान उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे महामार्गारील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सदर जंक्शन तसेच राष्ट्रीय महामार्ग ६६चे काही भाग टप्प्याटप्प्याने बंद करण्याची आवश्यकता असल्याने वरील निर्णय घेण्यात आला आहे, असे कार्यकारी अभियंत्यांनी या नोटिसीत म्हटले आहे.