थिवी रेल्वे स्थानकावर साडेतीन किलो गांजा जप्त

मूळ नेपाळच्या संशयिताला अटक; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी केली कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
56 mins ago
थिवी रेल्वे स्थानकावर साडेतीन किलो गांजा जप्त

म्हापसा: थिवी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून कोलवाळ पोलिसांनी ३.५ लाख रुपये किमतीचा साडेतीन किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी रोशन हर्ष जप्रेल (२५, मूळ रा. नेपाळ) या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या आवारातील पार्किंग स्थळी छापा टाकला. संशयित आरोपी मांडवी एक्स्प्रेसने मुंबईहून थिवी येथे उतरला होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या सामानात लपवून आणलेला साडेतीन किलो गांजा सापडला. हा गांजा गोव्यातील ग्राहकांना विकण्यासाठी आणला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन महिन्यांपूर्वी गोव्यात विविध भागातून येणाऱ्या स्थलांतरितांची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस खात्याला दिले होते. या निर्देशानुसार, कोलवाळ पोलिसांनी थिवी रेल्वे स्थानकात अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. याच पथकाने रेल्वे प्रवाशांची पडताळणी करताना हा गांजा जप्त केला.

गुन्हेगार पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात

संशयित आरोपी रोशन जप्रेल याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही साळगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून ७११ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तराज राणे, कॉन्स्टेबल सुदेश केरकर, निखील नाईक आणि सर्वेश राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा