कुटुंब बाहेर असताना घडली दुर्घटना; शॉर्ट सर्किटचा अंदाज
म्हापसा : कुमया मरड, गिरी येथील राकेश वाघेला यांच्या बंगल्याला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत स्वयंपाकघर आणि बेडरूम पूर्णपणे जळून खाक झाल्याने सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळी १०.२० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनेच्या वेळी वाघेला कुटुंब कामानिमित्त घराबाहेर होते. बंद असलेल्या घराला अचानक आग लागल्याने ती स्वयंपाकघर आणि बेडरूममध्ये झपाट्याने पसरली.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या एकमजली बंगल्याच्या दोन्ही खोल्यांमध्ये आग पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी फोम आणि पाण्याचा वापर करून आग नियंत्रणात आणली. त्यामुळे बंगल्याचे मोठे नुकसान टळले.
या आगीत वातानुकूलित संच, पलंग, कपडे, कपाट, विद्युत उपकरणे, सोन्याचे दागिने आणि इतर घरगुती सामान जळून भस्मसात झाले. शॉर्ट सर्किटमुळे किंवा दिवा-बत्तीमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज वाघेला कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. साळगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.