मडगावच्या नव्या मासळी बाजारात पारंपरिक मच्छीमारांना प्राधान्य द्या!

रापणकारांसाठी जागा राखीव ठेवा, पार्किंग शुल्क रद्द करा : पेले फर्नांडिस यांची मागणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
38 mins ago
मडगावच्या नव्या मासळी बाजारात पारंपरिक मच्छीमारांना प्राधान्य द्या!

पणजी : मडगाव येथील नव्या घाऊक मासळी बाजाराच्या उद्घाटनापूर्वी, स्थानिक आणि पारंपरिक मच्छीमारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी पारंपरिक मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी केली आहे. मच्छीमारांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय खात्याने नुकतीच एक बैठक घेतली होती. त्यानंतर, पत्राकरांना माहिती देताना त्यांनी या मागण्या मांडल्या.

मुख्य मागण्या आणि समस्या

स्थानिकांना प्राधान्य: नव्या बाजारात स्थानिक मच्छीमारांना आणि रापणकारांना (पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे) स्वतंत्र जागा राखीव ठेवावी. बाहेरून येणारे घाऊक विक्रेते मोठ्या गाड्या घेऊन येतात आणि संपूर्ण जागा अडवतात, त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना जागा मिळत नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

पार्किंग शुल्क रद्द करा: जे पारंपरिक मच्छीमार पिकअप घेऊन येतात, त्यांच्याकडून तासाला ३०० रुपये पार्किंग शुल्क आकारले जाते. हे मच्छीमार वर्षातून फक्त चार-पाच महिनेच मासेमारी करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हे शुल्क रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.

शितगृह (Chilling Room): बाजारात शितगृह बांधण्याचीही मागणी करण्यात आली आहे. जर रापणकारांच्या माशांना योग्य दर मिळाला नाही, तर घाऊक विक्रेते त्यांना कमी दरात विकत घेऊन कारखान्यात पाठवतात. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होते. शितगृहामुळे मच्छीमारांना योग्य दर मिळेपर्यंत मासे सुरक्षित ठेवता येतील. या मागणीला खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे पेले म्हणाले.

शौचालय उपलब्ध करून त्यांची योग्य निगा राखणे: सध्याच्या बाजारात शौचालयांची सोय नसल्याने विशेषतः महिलांना त्रास होतो. त्यामुळे नव्या बाजारात चांगल्या सुविधा असलेली शौचालये असावीत आणि त्यांचा वापर मोफत असावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मार्केट व्यवस्थापनाचे कंत्राट स्थानिकांनाच : बाजाराची स्वच्छता आणि व्यवस्थापनाचे कंत्राट स्थानिक पारंपरिक गोमंतकीय मच्छीमारांच्या सहकारी संस्थेला द्यावे. बाहेरचे लोक हे कंत्राट घेऊन मनमानी पद्धतीने शुल्क आकारतात, अशी तक्रारही त्यांनी केली.

या बैठकीमध्ये मच्छीमार संघटनेच्या अनेक मागण्यांवर चर्चा झाली असून, नवीन बाजारात या मागण्यांचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा पेले फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

हेही वाचा