'गोव्यातील व्यापाऱ्यांनी स्वदेशीचा अभिमानाने स्वीकार करावा' : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30 mins ago
'गोव्यातील व्यापाऱ्यांनी स्वदेशीचा अभिमानाने स्वीकार करावा' : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश येथे केलेल्या भाषणातून दिलेल्या ‘स्वदेशी’च्या हाकेला प्रतिसाद देत, गोव्यातील व्यापारी आणि ग्राहकांनी स्वदेशी वस्तूंनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पणजी येथे आयोजित ‘सेवा पखवाडा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशीचा पुरस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. गोव्यातील व्यापाऱ्यांनी ‘आम्ही स्वदेशी माल विकतो’ असे अभिमानाने सांगितले पाहिजे. रोजच्या वापरातील वस्तूंपासून ते लक्झरी वस्तूपर्यंत सर्व गोष्टी स्वदेशी असाव्यात. स्वदेशी वस्तूंमध्ये येथील लोकांचे कष्ट असतात आणि ग्राहकांनी त्या वस्तू खरेदी केल्यास त्याचा थेट फायदा देशातील लोकांनाच होईल.

महिलांसाठी विविध योजनांचा शुभारंभ

पंतप्रधानांनी आज महिलांसाठी विविध योजनांचाही शुभारंभ केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजनेअंतर्गत राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, तसेच मोफत उपचार व औषधेही दिली जातील. याशिवाय ‘मातृ वंदना योजने’नुसार पहिल्या मुलीला जन्म देणाऱ्या मातेला ५ हजार तर दुसऱ्या मुलीला ६ हजार रुपये दिले जातील. गोव्यातील महिलांना या योजनांचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना ६२ कोटींची कर्जे वितरित

ग्रामीण विकास खात्यामार्फत आज विविध महिला स्वयं-सहायता गटांना ६२ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. आजपर्यंत राज्यातील ५० हजार महिलांना ३५० कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, वाहन खरेदीसाठी २.१ कोटी आणि अन्य निधीच्या स्वरूपात ६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

‘डबल इंजिन’मुळेच गोव्याचा विकास

मागील काही वर्षांत गोव्याने पायाभूत सुविधांसह अन्य क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. गेल्या ११ वर्षांत गोव्यात यापूर्वी कधीही झाला नव्हता एवढा विकास झाला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार असल्यामुळेच हा विकास शक्य झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा