२० सप्टेंबरची अंतिम मुदत; अखिल भारतीय वाहतूक संघटनेचा जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे इशारा
मडगाव: अनमोड घाटातील भूस्खलनानंतर अवजड व्यावसायिक वाहनांवर घातलेली बंदी २० सप्टेंबरपर्यंत उठवली नाही, तर ट्रकचालक आंदोलन करतील आणि मोले चेकपोस्टवरील कामकाज थांबवतील, असा इशारा अखिल भारतीय वाहतूक संघटनेने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
गेल्या ५ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनामुळे अनमोड घाटातील अवजड व्यावसायिक वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. संघटनेने १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला वाहतूक सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र, १२ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत आपत्कालीन सेवा वाहनांसह फक्त सहा चाकी व्यावसायिक वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे, जो अवजड वाहन चालकांवर अन्याय असल्याचा दावा संघटनेने केला आहे.
घाट रस्त्याची दुरुस्ती करून पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचेही संघटनेने म्हटले आहे. अवजड वाहनांसाठी अनमोड घाटमार्ग बंद असल्याने चोर्ला घाट व यल्लापूर-कारवार हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी चोर्ला घाटाची अवस्था खराब आहे, तर यल्लापूर मार्गे गेल्यास एका बाजूने ११० किलोमीटर आणि एकूण २२० किलोमीटर जास्त प्रवास होतो. यामुळे इंधन खर्च वाढतो, देखभाल खर्च वाढतो आणि वाहतुकीला अधिक वेळ लागतो.
त्यामुळे, पुढील दोन दिवसांत अवजड व्यावसायिक वाहनांना अनमोड घाटातून वाहतूक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २१ सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला जाईल आणि मोले चेकपोस्ट परिसरातील कामकाज बंद केले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.