टॅक्सीसाठी डिजिटल मीटर कोणत्याही विक्रेत्याकडून घेता येणार : वाहतूक खात्याची सूचना

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
35 mins ago
टॅक्सीसाठी डिजिटल मीटर कोणत्याही विक्रेत्याकडून घेता येणार : वाहतूक खात्याची सूचना

पणजी : टॅक्सी चालकांना त्यांच्या टॅक्सीमध्ये बसवण्यात येणारे डिजिटल मीटर, प्रिंटर आणि जीपीएस यंत्रणा कोणत्याही विक्रेत्याकडून घेता येणार आहे. हे मीटर गोवा मोटार नियमांचे पालन करणारे आणि वजन व माप खात्याकडून प्रमाणित असणे आवश्यक आहे. याबाबत वाहतूक खात्याचे संचालक प्रविमल अभिषेक यांनी नुकतेच निर्देश जारी केलेत. यापूर्वी केवळ दोनच विक्रेत्यांकडून मीटर घेण्यास परवानगी होती.

वाहतूक खात्याच्या सूचनेत म्हटले आहे की, गोवा मोटार वाहन नियम १९९१ च्या नियम १४० नुसार प्रत्येक कॅबमध्ये डिजिटल भाडे मीटर बसवणे आवश्यक आहे. तसेच प्रिंटर आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणे आवश्यक आहे. बसवलेल्या मीटरवर वजन आणि माप खात्याचे सील असणे गरजेचे असेल. खात्याने यापूर्वी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मार्फत भाडे मीटर बसवण्यासाठी दोन विक्रेत्यांची निवड केली होती.

मात्र, विविध टॅक्सी ऑपरेटरनी केवळ दोन विक्रेत्यांऐवजी कोणत्याही विक्रेत्यांकडून मीटर बसवण्याचा पर्याय देण्याची मागणी केली होती. याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, सार्वजनिक वाहनात व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस आणि आपत्कालीन बटण बसवणे देखील गरजेचे आहे. या दोन्ही यंत्रणा देखील कोणत्याही विक्रेत्याकडून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हे बसवण्याचे काम अधिकृत डीलरकडूनच करावे लागणार आहे. वाहनांच्या फिटनेस चाचणीमध्ये या दोन्ही यंत्रणा तपासल्या जाणार आहेत.

हेही वाचा