मुरगाव पालिकेसमोर पेच : घन कचरा महामंडळाच्या निर्णयामुळे साचू लागले कचऱ्याचे ढीग
मुरगाव पालिकेच्या सडा कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचरा.
वास्को : घन कचरा व्यवस्थापन महामंडळाने मुरगाव पालिकासह इतरांकडून साळगाव कचरा प्रकल्र्पात ओला कचरा स्वीकारणे तत्काळ बंद केल्याने मुरगाव पालिका अडचणीत आली आहे.
याप्रकरणी योग्य तोडगा काढण्यासाठी मुरगाव पालिका मंडळाची गुरुवारी आपत्कालीन बैठक बोलाविण्यात आली आहे. महामंडळाने मंगळवारपासून कचरा स्वीकारणे बंद केल्याने मुरगाव पालिकेच्या सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात ओल्या, सुक्या कचरयाचे ढीग तयार होण्याची तसेच आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सडा कचरा प्रकल्पात मुरगाव पालिकेचा सुमारे १८ टन कचरा जमा होतो. त्यापैकी दहा-बारा टन ओला कचरा असतो. परंतु, आता साळगाव कचरा प्रकल्पात मुरगाव पालिकेचा ओला कचरा स्वीकारण्यात येणार नसल्याचे घन कचरा व्यवस्थापन महामंडळाने सोमवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. महामंडळाने घेतलेल्या या बैठकीला मुरगाव पालिकेचे अभियंते उपस्थित होते.
काकोडा प्रकल्पावर भिस्त
मुरगाव पालिकेचा ओला कचरा काकोडा कचरा प्रक्रिया प्रकल्पात स्वीकारेल. त्यासाठी १० टन ओला कचरा वाहून नेण्यासाठी खास डिझाईन केलेल्या वाहनाचा वापर केला जाईल. सदर वाहन काकोडाच्या घन कचरा व्यवस्थापन सुविधाच्या प्रकल्पाचे असेल. एका फेरीमध्ये अधिकाधिक दहा टन ओला कचरा त्या वाहनाद्वारा वाहून नेला जातो. यासंबंधी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार आहे.