‍‍पिटबुल, रॉटवायलरसारख्या हिंस्र कुत्र्यांवर निर्बंध

नवा कायदा लागू; उल्लंघन केल्यास ५० हजार दंड किंवा तुरुंगवास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th September, 11:44 pm
‍‍पिटबुल, रॉटवायलरसारख्या हिंस्र कुत्र्यांवर निर्बंध

पणजी : गोव्यात पिटबुल, रॉटवायलर किंवा इतर हिंस्र जातीच्या कुत्र्यांच्या संगोपनावर आता निर्बंध येणार आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात 'गोवा प्राणी प्रजनन, नियंत्रण आणि नुकसान भरपाई विधेयक' हा कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, हिंस्त्र जातीच्या कुत्र्यांची नोंदणी आणि निर्बीजीकरण (नसबंदी) करणे सक्तीचे आहे. या नियमांचे पालन न केल्यास १५ दिवस ते ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.

राज्यात गेल्या काही काळात पिटबुल आणि रॉटवायलरसारख्या कुत्र्यांनी हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात लहान मुलांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर, या कुत्र्यांवर बंदी घालण्याची मागणी होत होती. सरकारने हा कायदा संमत करून आता हिंस्र कुत्रे पाळण्यावर नियंत्रण आणले आहे. नव्या कायद्यानुसार, भविष्यात नवीन पिटबुल, रॉटवायलर किंवा इतर हिंस्र जातीचे कुत्रे आणण्यास मनाई करण्यात आली आहे.
नोंदणी आणि निर्बीजीकरण अनिवार्य
ज्यांच्याकडे सध्या पिटबुल, रॉटवायलर किंवा इतर हिंस्र जातीची कुत्री आहेत, त्यांना पुढील ३० दिवसांच्या आत त्यांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीनंतर ६० दिवसांच्या आत त्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणेही आवश्यक आहे. हे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
नुकसान भरपाईची तरतूद
या कायद्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी नुकसान भरपाईचीही तरतूद आहे. हल्ल्यात कोणी जखमी झाल्यास किंवा मरण पावल्यास, संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबियांना कुत्र्याच्या मालकाविरुद्ध नुकसान भरपाईसाठी खटला दाखल करता येईल. हा खटला हल्ल्यानंतर ६ महिन्यांच्या आत दाखल करावा लागेल आणि संबंधित यंत्रणेला त्यावर ३ महिन्यांच्या आत निर्णय द्यावा लागेल.      

हेही वाचा