टॅक्सीवाल्यांची दादागिरी आणि हॉटेल व्यवस्थापनाची बेफिकिरी

व्हायरल व्हिडिओत महिला पर्यटकाचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
36 mins ago
टॅक्सीवाल्यांची दादागिरी आणि हॉटेल व्यवस्थापनाची बेफिकिरी

मडगाव : अहमदाबाद येथील महिला पर्यटकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. टॅक्सी चालकांकडून भाडे मागण्यावरून गुंडागर्दी केली गेली असून, पोलिसांच्या नावे धमकी दिल्याचा आरोप तिने केला आहे. इतकेच नव्हे तर, हॉटेल व्यवस्थापनानेही तिला कोणतीही मदत केली नाही, असे तिने सांगितले. या सर्व प्रकारामुळे तिला तब्बल पाच किमी अंतर पायी चालत जावे लागले आणि त्यानंतरच दुसरी टॅक्सी मिळाली, असा दावा सदर महिलेने व्हिडिओत केला आहे.

व्हायरल व्हिडिओत पर्यटक महिलेने सांगितले की, अहमदाबाद येथून आपण पर्यटनासाठी गोव्यात आले होते. दक्षिण गेाव्यातील एका रिसोर्ट येथे ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत आपली बुकिंग होती. मात्र, हॉटेल्सबाहेर टॅक्सीवाल्यांची गुंडागर्दी दिसून आली. ज्याठिकाणी १८८० ते २००० भाडे होते, त्याठिकाणी ३५०० ते ४००० रुपये आकारण्यात येतात. याशिवाय हॉटेलकडे ऑनलाइन पद्धतीने टॅक्सी किंवा इतर गाडी बोलावण्यात आल्यास हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांकडून दादागिरी केली जाते. हॉटेल्समधील पर्यटकांना त्रास दिला जातो. पर्यटनासाठी आम्ही गोव्यात आलेलो होतो. पाच दिवसांचा चांगला अनुभव होता, पण शेवटच्या दिवशी आपणासोबत गैरवर्तन झाले. टॅक्सीवाल्यांनी ऑनलाइन पद्धतीने मागवलेली टॅक्सी आत येऊ दिली नाही. पाऊस असतानाही आपणास टॅक्सीत बसू दिले नाही. पावसात भिजत सामानासह आपणास हॉटेलमधून बाहेर पडावे लागले. त्यानंतर पाच ते सहा किमी पायी चालत पुन्हा टॅक्सी बुक करून त्यानंतर विमानतळाच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. याआधीही आपण गोव्यात पर्यटनासाठी आले होते, पण दक्षिण गोव्यातील या अनुभवासारखा वाईट अनुभव कुठेही आला नाही. देशातही अनेक ठिकाणी फिरले पण टॅक्सीवाल्यांचे असे वागणे कोठेही पाहिले नाही.

टॅक्सीवाल्यांकडून दक्षिण गोव्यात पर्यटकांना त्रास

दक्षिण गोव्यात येत असल्यास याठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गुंडागर्दी आहे. याठिकाणचे पोलीस प्रशासन काय करते ते आपणास माहीत नाही. टॅक्सीवाल्यांकडून थेट पर्यटकांना त्रास दिला जातो. पोलीस आल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही, अशी धमकी दिली जाते. ज्या हॉटेल्समध्ये राहत होतो, त्यांना दिवसाला साडेपाच ते सहा हजार रुपये अदा करत होतो. त्या हॉटेल्सवाल्यांकडून आम्हालाच शांत राहण्यास सांगण्यात येत होते. तेही पर्यटकांची जबाबदारी घेत नाहीत. टॅक्सीवाल्यांकडून लूट केली जात असल्याचा आरोपही सदर महिलेने व्हिडिओत केला आहे.

हेही वाचा