मुख्यमंत्री डॉ. सावंत : पणजीत दशावतार चित्रपटाचे प्रदर्शन
पणजी : दशावतार नाटक हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकण तसेच गोव्यातील काही प्रदेशातील पारंपरिक लोकनाट्य आहे. यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटामुळे नव्या पिढीला दशावतार आणि पर्यायाने कोकणी, मालवणी परंपरा समजेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बुधवारी पणजीत ‘दशावतार’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, अभिनेते दिलीप प्रभावळकर व अन्य कलाकार उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, दशावतार नाटक हे मूळचे कोकण भागातील असले तरी गोव्यातील सर्व गावांतील लोकांनी ते पाहिले आहे. नाटकाची लोकप्रियता अगदी कारवारपर्यंत आहे. आम्ही साखळीमध्ये दरवर्षी या नाटकाचे दोन प्रयोग ठेवतो. हे दोन्ही प्रयोग तिकीट असून देखील हाऊसफुल्ल होतात. आज काही ठिकाणी नाटक पाहण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी नवीन चित्रपटाने कलाकारांना आणि या परंपरेला नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे.
चित्रपटामुळे दशावतार कोकणी, मालवणी लोकांपर्यंत न राहता अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. चित्रपटाने ही परंपरा जगभर पोहोचणार आहे. आजच्या तरुण पिढीने नाटक बघितले नसेल तर चित्रपट तरी नक्की पहावा. यामुळे त्यांना दशावताराचे सांस्कृतिक महत्त्व समजेल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री