कोलवाळ पोलिसांकडून २.४० लाखांचे १३ मोबाईल जप्त
म्हापसा : कोलवाळ पोलिसांनी मोबाईल चोरी प्रकरणी संशयित आरोपी छय्यल मोंडल (२२, रा. डांगी कॉलनी, म्हापसा व मूळ पश्चिम बंगाल) याला मंगळवार, १६ रोजी अटक केली. त्याच्याकडून १३ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून या मोबाईलची किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे. म्हापशातील एका रेस्टॉरन्टमध्ये तो वेटर म्हणून कामाला होता.
कोलवाळ येथील दत्तप्रसाद पेट्रोल पंपावरून मे २०२५ मध्ये व्हीवोचा मोबाईल चोरीस गेला होता. वरील चोरीचा मोबाईल हा कुलदीप महतो (रा. मूळ झारखंड) नामक व्यक्ती वापरत असल्याचे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरद्वारे (सीईआयआर) पोलिसांना समजले. महतो याला पोलिसांनी म्हापशातील एका रेस्टॉरन्टमधून ताब्यात घेतले. सदर रेस्टॉरन्टमध्ये तो कूक म्हणून कामाला होता. चौकशीवेळी त्याने सदर मोबाईल हा रेस्टॉरन्टमधील वेटर छय्यल मोंडल याने आपल्याला विकल्याचे सांगितले.
पोलिसांनी संशयिताच्या डांगी कॉलनी म्हापसा येथील राहत्या खोलीवर छापा टाकला तेव्हा पोलिसांना अजून चार मोबाईल त्याच्याजवळ सापडले.
सखोल चौकशीअंती पोलिसांनी त्याच्याकडून अजून ८ मोबाईल जप्त केले. जे त्याने इतरांना विकले होते. सर्व जप्त केलेल्या १३ मोबाईलची किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे. इतर १२ मोबाईल त्याने कुठून चोरले याचा स्त्रोत आणि त्याच्या साथीदारांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करीत आहेत.
पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर व सहाय्यक उपनिरीक्षक अनिल पिळगावकर हे अधिक तपास करीत आहेत.