मडगाव : मुंगूल गँगवॉर प्रकरण : संशयितांना फरार होण्यास मदत करणाऱ्या एकाला सशर्त जामीन

दोन संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला; आतापर्यंत २५ जणांना अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
46 mins ago
मडगाव : मुंगूल गँगवॉर प्रकरण : संशयितांना फरार होण्यास मदत करणाऱ्या एकाला सशर्त जामीन

मडगाव: मुंगूल येथील गँगवॉर प्रकरणात फरार संशयितांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या परशुराम राठोड याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. याआधीच याच प्रकरणात संशयित दीपक कट्टीमणी यालाही सशर्त जामीन मिळाला होता.

संशयित परशुराम राठोड याने मुख्य आरोपी अविनाश गुंजीकर, इम्रान बेपारी, अक्षय तलवार आणि मोहम्मद ताहीर यांना गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती असूनही गोव्यातून पळून जाण्यास मदत केली. त्यानंतर त्याने त्यांना यारगट्टी, कर्नाटक येथील लॉजमध्ये वास्तव्याची सोय करून दिली. या काळात तो सतत त्यांच्या संपर्कात होता, असा आरोप पोलिसांकडून ठेवण्यात आला होता.

जामिनासाठीच्या अटी

परशुराम राठोडने ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने २५ हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी फातोर्डा पोलीस स्थानकात हजेरी लावणे, मोबाईल क्रमांक आणि पत्ता जमा करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे आणि परवानगीशिवाय देश सोडून न जाणे अशा अटींवर त्याला जामीन मंजूर केला.

इतर दोन आरोपींचा जामीन फेटाळला

दरम्यान, याच गँगवॉर प्रकरणातील संशयित अमोघ नाईक याने दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, आणखी एक संशयित सूरज मांझी याने अटक झाल्यानंतर ३० ऑगस्ट रोजी जामिनासाठी केलेला अर्जही न्यायालयाने नामंजूर केला आहे.

या प्रकरणात फातोर्डा पोलिसांना आतापर्यंत २५ संशयितांना अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणातील आणखी काही संशयितांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली आहे.