नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना लावले गळाला; गोव्यातील एकाचा समावेश. बँकोकला जाण्याच्या तयारीत असताना सापडला तपास यंत्रणांच्या जाळ्यात.
मुंबई : गोव्यातील एका शिपिंग कंपनीच्या संचालकाला मानवी तस्करी रॅकेटप्रकरणी मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. मुंबई शहर क्राईम ब्रांचने रविवारी अजय शिरोडकर या संचालकाला बँकोकला पळून जाण्याच्या तयारीत असताना सापळा रचून अटक केली. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या 'लुक आऊट' नोटीसीवरून ही कारवाई करण्यात आली.
शिरोडकर याची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कसून तपासणी करण्यात आली व त्याच्याकडून ७ मोबाईल संच, बरीच सीमकार्डस, शिपिंगमधील नोकरीची बनावट पत्रे, इमिग्रेशन दस्तऐवज व इतर संशयास्पद फाईल्स पोलिसांनी जप्त केल्या. त्याच्या पासपोर्टची प्रत चेन्नई एफएफआरओने लुक आऊट नोटीसीमध्ये चिकटवली होती. बेकायदेशीररीत्या थायलंड व मेक्सिको येथे संशयास्पद कारवाया केल्याप्रकरणी लुक आऊट नोटीस जारी केली होती. इमिग्रेशनने आरोपीला क्राईम ब्रांचच्या युनिट आठकडे सोपवले.
शिरोडकरने आपल्या 'शिरोडकर ओशियन एम्प्लोयर प्रा. लिमिटेड कंपनी'च्या मार्फत जहाजावर नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी होत्या. जहाजावर नोकरी देण्याच्या बहाण्याने त्याने अनेकांकडून १ लाख रुपये, ५ लाख रुपये अशी रक्कम उकळली होती. त्याचबरोबर त्याने कित्येकांना बेकायदेशीररीत्या युके, अमेरिकेत ही पाठवले होते. पंजाब, हरयाणा, मॅक्सिको व अमेरिकेत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या बेकायदेशीर कारवायांना मूर्तस्वरूप दिले होते. हवाला ऑपरेटर्स व कित्येक इमिग्रेशन कर्मचाऱ्यांशी देखील त्याची जवळीक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोव्यातील एकाचा समावेश..
पोलीस चौकशीत शिरोडकर यांनी सहा जणांची फसवणूक केल्याची कबुली दिली. फसवणूक केलेल्यांत गोव्यातील कार्तिक नाईक याचा ही समावेश आहे. त्याला अमेरिकेन जहाजावर नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे ही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या त्याच्या लॅपटॉप मधून अनेकांना देण्यासाठी तयार केलेली बनावट सर्टिफिकेट व कागदपत्रे ही पोलिसांना सापडली आहेत.
शिरोडकर याला न्यायालयात उभे करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गोवा पोलीस त्याला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. शिरोडकर याच्यावर मानवी तस्करीची अनेक प्रकरणे नोंद आहेत. त्यात गोव्यातील दोन, कर्नाटकमधील एक व उत्तरप्रदेश येथील एका प्रकरणाचा समावेश आहे. तपास करणाऱ्यांच्या माहितीनुसार, त्याने डझनभर भारतीयांना बेकायदेशीररीत्या विदेशात पाठवले आहे. विदेशात पाठवल्यांची काही कागदपत्रे देखील तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत.