एआय टूलने अदृश्य तीळ दाखवल्याचा तरुणीचा दावा; वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेवर चिंता
मुंबई : गूगलचे जेमिनी हे एआय टूल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. फोटो तयार करण्याच्या क्षमतेमुळे ते अनेक युजर्सना आकर्षित करत आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेने या टूलच्या कार्यक्षमतेवर आणि गोपनीयतेच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेल्या धक्कादायक अनुभवामुळे अनेकजण आपल्या ऑनलाइन प्रायव्हसीबद्दल सध्या चिंतेत आहेत.
झलक भवनानी नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती सांगते की, तिने गूगल जेमिनीच्या 'नॅनो बनाना' फीचरचा वापर करून एक एआय फोटो तयार केला. यासाठी तिने असा फोटो अपलोड केला होता, ज्यामध्ये तिने पूर्ण बाह्यांचा ड्रेस घातला होता. त्यानंतर तिने एआयला ‘रेट्रो साडीतील फोटो’ तयार करण्यासाठी प्रॉम्प्ट दिला.
गूगल जेमिनीने तिला एक सुंदर फोटो दिला, ज्यामध्ये ती एका काळ्या साडीत दिसत होती. झलकने आनंदाने तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. परंतु, जेव्हा तिने तो फोटो पुन्हा बारकाईने पाहिला, तेव्हा तिला धक्काच बसला. एआयने तयार केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातावर एक तीळ दिसत होता, जो तिने अपलोड केलेल्या मूळ फोटोमध्ये दिसत नव्हता.
"हा तीळ जेमिनीला कसा दिसला?" असा प्रश्न तिने व्हिडिओमध्ये विचारला आहे. अपलोड केलेल्या फोटोत तिच्या हातावरचा तीळ दिसत नसतानाही एआयने तो कसा दर्शवला, हे एक मोठे गूढ बनले आहे. ही घटना समोर आल्यानंतर हजारो युजर्सनी कमेंट करत त्यांच्यासोबतही असेच काही अनुभव घडल्याचे म्हटले आहे.
गूगलकडे तुमचा डेटा?
एका युजरने यामागची एक शक्यता स्पष्ट केली आहे. जेमिनी हे गूगलचेच एक उत्पादन आहे. त्यामुळे गूगलला तुमच्या गूगल अकाउंटमधील डेटाचा एक्सेस असतो, ज्यात तुमचे फोटो आणि इतर माहिती समाविष्ट असू शकते. याच आधारावर Gemini ने हा फोटो तयार केला असावा,असे त्याने म्हटले आहे.
हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक युजर्स त्यांच्या वैयक्तिक फोटो आणि माहितीच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत आहेत. तुम्हीही गूगल किंवा तत्सम एआय टूल्सचा वापर करत असाल, तर आपली खासगी माहिती शेअर करताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.