शिर्डी : साईसंस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट उघडून भाविकांची राजरोसपणे फसवणूक!

डिजिटल भामट्यांपासून राहा सावधान : साईसंस्थानचा इशारा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
शिर्डी : साईसंस्थानच्या नावाने बनावट वेबसाईट उघडून भाविकांची राजरोसपणे फसवणूक!

शिर्डी: साईबाबांच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या एका भक्ताला एका चुकीमुळे मोठा फटका बसला. कर्नाटकातील गुलबर्गा येथून मोठ्या श्रद्धेने आलेल्या या भक्ताची, साईंच्या दरबारी पोहोचण्याआधीच ऑनलाईन फसवणूक झाली. शाहनिशा केली असता सायबर भामट्यांनी साईसंस्थानच्या भक्तनिवासाची हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करून साईभक्तांना त्यांच्या डिजिटल जाळ्यात अडकवण्याचा नवा कट रचल्याचे समोर आले.



याच कटाचे शिकार ठरले कर्नाटकातील साईभक्त रामू जाधव. शिर्डीला येण्याआधी त्यांनी मुक्कामासाठी भक्तनिवासाची खोली बुक करण्यासाठी गुगलवर वेबसाईट शोधली. त्यांना साईसंस्थानच्या अधिकृत वेबसाईटसारखीच दिसणारी एक बनावट वेबसाईट सापडली. त्या वेबसाईटवरून बुकिंग करण्यासाठी व्हॉट्सॲपवर एक स्कॅनर देण्यात आला होता. जाधव यांनी त्या स्कॅनरचा वापर करून २१०० रुपये दिले आणि त्यांच्या बुकिंगची पुष्टीही मिळाली.



जेव्हा रामू जाधव त्यांच्या नातू आणि सुनेसोबत शिर्डीतील भक्तनिवासात पोहोचले, तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांच्या नावाने कोणतीही बुकिंग नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी तात्काळ त्या बनावट वेबसाईटवरील नंबरवर फोन केला असता, त्यांच्याकडे आणखी ९०० रुपयांची मागणी करण्यात आली. यावरून त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांना स्पष्ट झाले.



ही केवळ रामू जाधव यांचीच नव्हे, तर अशा अनेक साईभक्तांची फसवणूक झाली आहे. यापूर्वीही साई दर्शनाच्या आणि देणग्यांच्या नावाखाली ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या घटनेने साईभक्तांनी कोणत्याही भक्तनिवासाची किंवा देवस्थानची ऑनलाइन बुकिंग किंवा देणगी देताना शंभरवेळा खातरजमा करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हेही वाचा