मडगाव : मुंगूल येथे झालेल्या गँगवॉर प्रकरणातील संशयित परशुराम राठोड याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याआधी या प्रकरणातील संशयित दीपक कट्टीमणीला जामीन मिळालेला होता.
मुंगूल गँगवॉर प्रकरणात आतापर्यंत २५ संशयितांना अटक करण्यात फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आणखीही काही संशयितांना अजूनही अटक होणार असल्याचे दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले आहे. दरम्यान, गँगवॉरप्रकरणातील संशयित परशुराम राठोड याला सशर्त जामीन मंजूर झालेला आहे.
संशयित दीपक कट्टीमणी याच्यासह परशुराम राठोड याने अविनाश गुंजीकर, इम्रान बेपारी, अक्षय तलवार, मोहम्मद ताहीर हे गंभीर गुन्ह्यात सहभागी असल्याचे माहीत असूनही त्यांना गोव्यातून पळून जाण्यात सहकार्य केले. त्यानंतर यारागट्टी कर्नाटक येथील लॉजमध्ये त्यांच्या वास्तव्याची सोयही केली. या कालावधीत संशयितांशी संपर्क साधून होता, असाही आरोप होता.
संशयित परशुराम राठोड याने ४ सप्टेंबर रोजी न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर केला होता. न्यायालयाने २५ हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच रकमेचे दोन हमीदार, दुसर्या व चौथ्या शनिवारी फातोर्डा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, मोबाईल क्रमांक, वास्तव्याचा पत्ता जमा करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे, परवानगीविना देश सोडून जाऊ नये अशा अटीशर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला.
दोन संशयितांचा जामीन फेटाळला
गँगवॉर प्रकरणातील संशयित अमोघ नाईक याने दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आला आहे. याशिवाय आणखी एक संशयित सूरज माझी याने अटकेनंतर ३० ऑगस्ट रोजी जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्याचा जामीन अर्जही न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.