सोनूचं रडणं वेगळं होतं. त्या रडण्यात हट्ट नव्हता, त्यात एक निरागस ओढ होती - आपल्या बाप्पाबद्दलची. बाकीची मुलं मोबाईलमध्ये विसर्जनाचे व्हिडिओ पाहून हसत होती. पण सोनूला मोबाईलमधला बाप्पा नको होता.

अंधार पडत चालला होता. शेतातून सोनूची आई घरी परत येत होती. दोडक्याची भाजी होती. घरात सणाचं वातावरण होतं. गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू होती. प्रत्येक वर्षीप्रमाणे सगळं व्यवस्थित आणि वेळेवर व्हावं, यासाठी ती एकटीच धावपळ करत होती. सण म्हणजे आनंद असतो, पण तिच्यासाठी तो काळ म्हणजे कामांचा डोंगर
होता.
सोनूची आई एकटी पडायची. काम खूप असायचं. सासरचं घर, नातेवाईकांचं येणं, सणाची जबाबदारी आणि यामध्ये हट्टी, खोडकर, पण निरागस सोनू. वय फक्त चार वर्षं. बाजारात जायचं म्हटलं की हट्ट - कधी खेळणी, कधी चॉकलेट. तिला माहिती होतं, सोनूला बाजारात घेऊन जाणं म्हणजे रणांगणात उतरल्यासारखं असतं. म्हणून ती नवऱ्याच्या शनिवार-रविवारच्या सुट्टीची वाट पाहायची. त्याच वेळी काहीतरी काम उरकता येई, थोडीशी मदत मिळे.
नातेवाईक आले की सगळ्यांच्या नजरा सोनूवर आणि त्याच्या आईवर. कोणी म्हणायचं, “खूपच दंगा करतो बघ, शिस्त लागली पाहिजे.” कोणी दुसरं म्हणायचं, “फटका दे. प्रेमानं काही होत नाही.” तिसरं कोणी म्हणायचं, “अशीच मायेची सवय लावलीस तर नंतर त्रास होतो.” कुणीही सोनूला समजावायचं नाही, पण त्याच्या आईला मात्र शिकवण देण्यासाठी सगळ्यांना वेळ होता.
ती गप्प राहायची. ऐकत राहायची. घरात सोनूचं वागणं किती चुकीचं वाटतं, याची यादी दर वेळेस वाढायची. आईचं काहीही चांगलं दिसायचंच नाही. पण ती कोणतंही उत्तर देत नसे. फक्त कामं करत राहायची, आणि सोनूला हातातून सटकू न देण्याचा प्रयत्न करत राहायची.
सण जवळ येत होता. लाडू, चकल्या, पूजेचं सामान, मखर सगळं जुळवायचं होतं. घरातली सगळी तयारी तिच्यावर. लहान पोरगा, मोठं घर, आणि सणाचं ओझं. शनिवारी नवऱ्याबरोबर बाजारात गेली. सोनूचा नेहमीचा कार्यक्रम सुरू झाला. खेळणी, गाड्या, टपोरी चॉकलेट्स आणि डोळे दिपवणाऱ्या लाईटी. त्याच्या त्या खोडकर हट्टांमध्येही एक निरागसता होती, पण ती आईच्याच डोळ्यांना दिसायची. त्याचे बाबाही तेवढेच भावुक.
हरतालिकेच्या दिवशी सोनूनं इतकं गोड खाल्लं, की त्याचं पोट दुखायला लागलं. तो सारखा रडत राहिला. नातेवाईक बघत होते. एकीकडे उपवास करत करत, घरातल्या कामांची घाई करत ती सोनूला शांत करत होती. पण कुणालाच हे दिसत नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं ती आई म्हणून कमी पडते आहे.
दररोज ती नवीन काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत असे. भांडी घासत असताना, सोनू तिच्याजवळ यायचा. ती त्याला भांडं काढायला सांगायची, तो ते हसत-खेळत करायचा. काही वेळा कुणी ओरडायचं, तर तो पण ओरडायचा. आईच्या प्रत्येक हालचालीवर तो पाय ठेवून चालायचा. ती काम करत असली, तरी त्याच्याशी बोलत राहायची, त्याला त्याचे बाबा गोष्टी सांगत राहायचे.
पाचवा दिवस उजाडला. दुपारचा नैवेद्य झाला. सगळे मनसोक्त जेवले. बाकीची मुलं मोबाईलमध्ये रमली होती—टॅबवर गेम, गाणं, युट्युब. पण सोनू तसाच दंगामस्ती करत. जरा हट्टी, पण जिवलग. संध्याकाळी विसर्जनाची तयारी सुरू झाली. बाप्पाचं
मखर हलवलं गेलं. आरती झाली.
पंचखाद्य वाटलं. सगळ्यांनी बाप्पाला नमस्कार केला.
“गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!” अशा गजरात सगळे विसर्जनासाठी देवळात निघाले. सोनू देखील बाप्पासोबत आरती करत होता, बोबड्या स्वरात “मोरया मोरया” म्हणत होता. पण जसजशी बाप्पाची मूर्ती दूर जात होती, तसतसं सोनूचं मन बेचैन होत होतं.
तो अचानक आईकडे पाहून रडायला लागला.
“आई... मला बाप्पा पाहिजे!”
आईने वाटलं, रोजचं काहीतरी रडणं असेल. पण त्याचा स्वर वेगळा होता.
“माझा बाप्पा... बाप्पा पाहिजे मला... घरी ने बाप्पा!”
आईचं काळीज भरून आलं. ती क्षणभर थांबली. सोनूचं रडणं वेगळं होतं. त्या रडण्यात हट्ट नव्हता, त्यात एक निरागस ओढ होती - आपल्या बाप्पाबद्दलची. बाकीची मुलं मोबाईलमध्ये विसर्जनाचे व्हिडिओ पाहून हसत होती. पण सोनूला मोबाईलमधला बाप्पा नको होता.
त्याला हवा होता तो - त्याच्या घरातला बाप्पा. फुलांनी सजवलेला, त्याच्यासोबत बोलणारा, त्याचं ऐकणारा, त्याला पाहून हसणारा बाप्पा. आई शांत होती, पण आतून हललेली होती. हेच सोनूचं खरं विश्व होतं - ते तुटू नये, हीच एक इच्छा तिच्या
मनात घर करून बसली होती. बाप्पा गेले होते. पण सोनूच्या त्या एका रडण्याने, त्या क्षणी, त्या आईचं सगळं थकव्याचं विसर्जन झालं होतं.

स्नेहा बाबी मळीक