बार्देशमध्ये ११ दिवसांच्या सार्वजनिक गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप

‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर : तलाव, नदी, समुद्रात केले विसर्जन


07th September, 12:11 am
बार्देशमध्ये ११ दिवसांच्या सार्वजनिक गणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप

म्हापसा पोलीस स्थानकातील गणेशमूर्तीचे तारीर येथे म्हापसा नदीत विसर्जन करताना भाविक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : बार्देश तालुक्यातील ११ दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे शनिवारी, अनंत चतुर्दशी दिनी भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले.
म्हापसा, खोर्ली व अन्साभाट या मंडळांच्या मूर्तीसह म्हापसा पोलीस स्थानकाच्या मूर्तीचे तारीर येथे म्हापसा नदीत, कुचेली गणेशोत्सव मंडळाच्या तेथील नदीत, तसेच कळंगुट, कांदोळी, वेरे, पिळर्ण, शापोरा, कायसूव, येथील मूतींचे समुद्रात विसर्जन करण्यात आले. कामुर्ली, अस्नोडा, गणेशनगर कोलवाळ, बस्तोडा, नास्नोळा, हळदोणा, पर्वरी जुना बाजार, शिवोली, विद्यानगर पर्वरी व नीळकंठ ब्रह्मेश्वर देवस्थान येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे तेथील स्थानिक नद्यांमध्ये विसर्जन करण्यात आले.
शनिवारी सायंकाळी श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक सुरू झाली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. दिंडी व बँण्डवाद्य पथकाच्या तालावर मिरवणूक निघाली. मूर्ती विसर्जनस्थळी पोहोचल्यावर ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात विसर्जन करण्यात आले. नेरूलमधील श्री सिद्धिविनायक मंदिर, पर्रा येथील श्री वरद सिद्धिविनायक मंदिर व गणेशपुरी म्हापसा येथील श्री संग्राम गणेश मंदिर या मंदिरातील २१ दिवसीय सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
सुदैवाने मोठी हानी टळली
म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होताच बाजारपेठेत फटाके व दारू सामानाची आतषबाजी सुरू झाली. शांतादुर्गा हॉटेल जवळील सुलभ सौचालयाच्या बाजूला असलेल्या एका दुकानावर फाटाक्यांतून निघालेली ठिणगी पडली. त्यामुळे दुकानालीत सामानाला आग लागली. मात्र दुकान मालक व शेजारील व्यापाऱ्यांनी ही आग तत्काळ विझवली. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.          

हेही वाचा