वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांचे आवाहन
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कुटबण जेटीवर पाण्याची, शौचालयांची सोय उपलब्ध आहे. याशिवाय स्वच्छता राखण्याचे काम केले जात अाहे. कोणीही साथरोगाची लक्षणे लपवून न ठेवता आरोग्य खात्याच्या अधिकार्यांना त्याची माहिती द्यावी, असे आवाहन आमदार क्रूझ सिल्वा यांनी केले.
वेळ्ळीचे आमदार सिल्वा यांनी कुटबण जेटीवरील परिस्थितीवर भाष्य केले. दोन दिवसांपूर्वी कुटबण येथील एका कामगाराला अतिसाराचा त्रास होत असल्याने उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसर्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून नेमके कारण पुढे आलेले नाही. कुटबण जेटीवरील कामगारांची आरोग्य तपासणी केली जाते. कामगारांना आवश्यक उपचारही दिले जातात. कुटबण जेटीवर यापूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळले होते; पण कॉलराचे रुग्ण आढळले नव्हते. दोन वर्षांपासून कॉलराच्या रुग्णांत वाढ होत असून यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे, असेही आमदार सिल्वा म्हणाले.
कामगाराच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट
ओडिशा येथील कामगार देबाचन किसन याला डिस्चार्ज दिल्यानंतर दुसर्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्याला अतिसाराचा त्रास होत होता व त्यावर उपचार करण्यात आले होते. शवचिकित्सा अहवालात न्यूमोनिया झाल्याचे कारण समोर येत आहे. त्यामुळे त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. यापूर्वीही एका कामगाराचा जेवण केल्यानंतर काही वेळाने मृत्यू होण्याचा प्रकार घडला होता.