वास्कोतील कदंब बसस्थानक बांधकामाचा शुभारंभ दिवाळीपूर्वी

आमदार दाजी साळकर : मडगाव मार्गावरील ई बसगाड्यांचा शुभारंभ


06th September, 11:58 pm
वास्कोतील कदंब बसस्थानक बांधकामाचा शुभारंभ दिवाळीपूर्वी

ई बसगाड्यांना बावटा दाखवून शुभारंभ करताना आमदार कृष्णा साळकर. सोबत गिरीश बोरकर, शमी साळकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : येथील नवीन कदंब बसस्थानक बांधकामाचा शुभारंभ दिवाळीपूर्वी करण्यात येईल. हे बसस्थानक गोव्यातील उत्कृष्ट बसस्थानक असेल, उद्गार वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी काढले. कदंब महामंडळाने वास्को ते मडगाव मार्गासाठी चार नवीन ई बसगाड्या दिल्या आहेत. त्या बसगाड्यांचा शुभारंभ आमदार साळकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश साळगावकर, दिलीप काजळे, संतोष शेट्ये, संदीप नार्वेकर व इतर उपस्थित होते. वास्को ते मडगाव मार्गावरील जुन्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन होत होता. त्यामुळे या मार्गावर नवीन बसगाड्यांची सोय करण्याची विनंती आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे केली होती. शटल सर्व्हिस बसगाड्यांची संख्या वाढविण्याची मागणीही केली आहे. सकाळच्या वेळी गोव्याबाहेरून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. ते वास्कोबाहेर जाण्यासाठी शटल सर्व्हिस बसगाड्यांचा वापर करतात. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व इतर प्रवाशांना बसमध्ये जागा मिळत नाही. बसगाड्याची संख्या वाढविली, तर हा प्रश्न सुटू शकतो. असे ते म्हणाले.
बसस्थानक तात्पुरते स्थलांतरित होणार
यंदा पाऊस लवकरच सुरू झाल्याने रस्त्यांचे हॉटमिक्स राहिले. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत, याची आपणास जाणीव आहे. हॉटमिक्स प्लांट सुरू झाल्यावर त्वरित हॉटमिक्सचे काम हाती घेण्यात येईल. नवीन बसस्थानक बांधताना बसगाड्यांची दुसरीकडे सोय करण्याची गरज आहे. कदंब बसस्थानकसाठी मुरगाव पालिकेने जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे बसस्थानक तात्पुरते तेथे हलविण्यात येणार आहे, असे आमदार दाजी साळकर यांनी सांगितले.

हेही वाचा