विरोधी पक्षही उमेदवार देण्याच्या तयारीत
पणजी : गोवा विधानसभेच्या नव्या सभापती पदासाठी भाजपच्या वतीने गणेश गांवकर हे सभापतीपदाचे उमेदवार असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, विरोधी पक्षांकडूनही उमेदवार देण्याचे ठरविण्यात आले आहे. सभापतीच्या निवडीसाठी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी २५ सप्टेंबर २०२५ रोजी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे.
कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचा राजीनामा घेण्यात आला. तर, आजारी असलेले कायदा व पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे या रिक्त झालेल्या दोन जागी रमेश तवडकर आणि दिगंबर कामत यांची मंत्रिपदी वर्णी लागली. त्यामुळे सभापती पद रिक्त हाेते.
सभापती पदासाठी आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत. यासाठी लवकरच विरोधी पक्षांची बैठक बोलावणार आहोत. या बैठकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी दिली.