मडगाव : बिटस पिलानी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूंना केवळ आत्महत्या मानून दुर्लक्ष करू नये, तर त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा शाखेकडून करण्यात आली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आप युवा शाखेचे अध्यक्ष रोहन नाईक, तसेच नॅश कुतिन्हो आणि शिवा नाईक उपस्थित होते. या वेळी बोलताना रोहन नाईक म्हणाले की, डिसेंबरपासून आतापर्यंत कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य व मार्गदर्शनासाठी समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिले असले तरी, राज्यात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पाचव्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर हे निर्देश तातडीने लागू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
नॅश कुतिन्हो यांनी विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागे अभ्यासाचा दबाव की इतर काही कारणे आहेत, हे स्पष्ट होण्यासाठी चौकशी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. राज्यात इतर शैक्षणिक संस्था असूनही मृत्यूची प्रकरणे प्रामुख्याने बिटस पिलानीतच होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
याशिवाय, कॅम्पसमध्ये पार्सल देण्यासाठी येणाऱ्या डिलिव्हरी बॉयमार्फत ड्रग्ज किंवा अमलीपदार्थांची देवाणघेवाण होत आहे का, याचाही तपास व्यवस्थापन व राज्य सरकारने करावा, अशी मागणी आपने केली.